श्रीनगर, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. उत्तराखंडमधील चमोली जिह्यात सकाळी हिमस्खलन झाले. त्याचबरोबर काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीमुळे महामार्ग बंद करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये डोंगरातून रस्त्यावर दगड आणि माती पडल्याने जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. राजस्थानमधील अनेक जिल्हय़ांमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
उत्तर भारतातील बऱयाच पर्यटनस्थळांवर सध्या हिमवर्षाव सुरू आहे. बर्फाच्या चादरीत लपेटलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची संख्या वाढत असली तरी काही ठिकाणी जनजीवन कोलमडलेले दिसत आहे. दुसरीकडे, दिल्लीत थंडीची लाट सुरू आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे सोमवारी सकाळपासूनच दिल्लीत थंडी होती. दिल्ली-एनसीआरच्या बहुतांश भागात पावसाची शक्मयता आहे. 29 जानेवारीला बीटिंग द रिट्रीट सोहळाही पावसात पार पडला होता. सोमवारीही येथे पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली होती.
हिमाचलमध्ये कुल्लू, शिमला, लाहौल स्पिती, कांगडा, मंडी आणि किन्नौरच्या उंच शिखरांवर बर्फवृष्टी झाल्यामुळे जिल्हा मुख्यालयाचा संपर्क तुटला आहे. किन्नौरमध्ये अडीच फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. राज्यातील 4 महामार्गांसह 320 रस्ते बंद करण्यात आले आहेत.









