ऑनलाईन टीम / कनौज :
उत्तर प्रदेशमधील कन्नौजमध्ये ट्रक आणि प्रवाशी बसच्या अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीत बसमधील 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. या बसमधून 43 प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान, वाटेतच बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. काही क्षणातच आगीने रुद्र रुप धारण केल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे 20 प्रवाशांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. तर 21 जण जखमी झाले आहे.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख, जखमींना 50 हजारांची मदत
दरम्यान, मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.









