डीआरडीओ प्रयोगशाळेच्या कामाचा शुभारंभ
वृत्तसंस्था/ लखनौ
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लखनौमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ केला आहे. जगातील कुठल्याही देशाने भारताकडे वाईट नजरेने पाहू नये म्हणून आम्ही ब्राह्मोसची निर्मिती करत आहोत. आम्ही शस्त्रास्त्रs तसेच अन्य उपकरणे जगातील कुठल्याही देशावर आक्रमण करण्यासाठी निर्माण करत नसल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
आमच्या एका शेजारी देशाने पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला, त्यानंतर आमच्या पंतप्रधानांनी निर्णय घेत त्याच्या भूमीवर जाऊन दहशतवाद्यांचा बीमोड घेतला गेला. एअर स्ट्राइकमध्येही आम्ही यश मिळविले होते. जर कुणी आमच्याकडे वाकडय़ा नजरेने पाहत असेल तर आम्ही सीमा ओलांडूनही कारवाई करू शकतो हा संदेश आम्ही दिला. हे भारताचे सामर्थ्य आहे. ब्राह्मोस निर्मिती केंद्र आणि डीआरडीओची प्रयोगशाळा आमच्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तसेच संरक्षण उत्पादनात उत्तरप्रदेशाला एक विशेष स्थानाचा मान मिळवून देण्यास हे प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे राजनाथ म्हणाले.
नव्या प्रकल्पामुळे राज्यातील लोकांना रोजगार मिळेल आणि उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. 6-10 महिन्यांमध्ये भूमी अधिग्रहण होऊ शकेल असा विचारच केला नव्हता. परंतु मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीड महिन्यांमध्ये या प्रकल्पासाठी 200 एकर जमीन उपलब्ध केल्याची माहिती राजनाथ यांनी दिली.
उत्तरप्रदेशातील योगी सरकारने माफियांचे वर्चस्व भेदले आहे. माफियांच्या सर्व ठिकाणी बुलडोझर चालत आहेत. याचमुळे जगभरातील गुंतवणूकदार उत्तरप्रदेशात पैसा गुंतवत आहेत असे राजनाथ यांनी म्हटले. याचबरोबर प्रसिद्ध मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आहे.









