वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशसह देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशात सध्या कुठलीच मोठी सभा आयोजित करणार नसल्याची भूमिका पक्षनेतृत्वाने घेतली आहे. उत्तरप्रदेश निवडणुकीत काँग्रेस आता व्हर्च्युअल सभांवर भर देणार आहे. पक्षाने याचबरोबर राज्यात आयोजित होणाऱया मुलींच्या मॅराथॉनही रद्द केल्या आहेत.
देशात वाढत्या कोरोनाबाधितांमुळे काँग्रेस चिंतेत आहे. याचमुळे उत्तरप्रदेशात काँग्रेसने दोन आठवडय़ांपर्यंत सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात स्थितीचा आढावा घेत निर्णय घेतला जाणार आहे. काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण करत अन्य पक्ष देखील सभा न घेण्याबद्दल विचार करतील अशी अपेक्षा आहे. अन्य राज्यांमध्येही स्थितीचा आढावा घेत निर्णय घेण्यास सांगितले असल्याचे विधान काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी केले आहे.
काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतित मोठा बदल केला आहे. काँगेस आता डिजिटल आणि सोशल मीडियावरील प्रचारमोहिमेवर भर देणार आहे. याचबरोबर छोटय़ा सभांसह व्हर्च्युअल सभा आयोजित करण्याचा विचार केला जातोय.
पक्षनेतृत्वाने वाराणसी आणि आझमगढमध्ये प्रस्तावित मॅराथॉन रद्द केली आहे. बरेलीत आयोजित मॅराथॉनमध्ये मंगळवारी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती, यात अनेक मुली जखमी झाल्याने काँग्रेस पक्षाच्या मॅराथॉनवर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस यावेळी महिलाच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित करत आहे. यांतर्गत ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या घोषणेसह काँग्रस उत्तरप्रदेशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. याच अंतर्गत विविध शहरांमध्ये मुलींच्या मॅराथॉनचे आयोजन केले जात होते. परंतु राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने यावर नाराजी व्यक्त करत बरेलीच्या जिल्हाधिकाऱयांना नोटीस बजावली आहे. मुलांचा राजकीय सभांसाठी वापर केला जाऊ शकत नसल्याचे आयोगाच्या प्रमुखांनी म्हटले आहे.









