विधानसभा निवडणुकीपूर्वी मायावतींची मोठी खेळी – अयोध्येतून होणार सुरुवात
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाने मोठी खेळी केली आहे. बसप अध्यक्षा मायावती यांनी दलित-ब्राह्मण कार्डवर भर दिला आहे. 23 जुलैपासून राज्याच्या 18 विभागांमध्ये बसपकडून ब्राह्मण संमेलनांचे आयोजन केले जाईल. याचा शुभारंभ अयोध्येतून होणार असल्याची घोषणा मायावतींनी रविवारी केली आहे. बसपचे महासचिव सतीश चंद मिश्र यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जनता, देश आणि राज्यातील अनेक मुद्दय़ांवर केंद्र सरकारचे उत्तरदायित्व इच्छितो. अशा मुद्दय़ांवर विरोधी पक्षांनी एकजूट आणि गंभीर होत सरकारला आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या 3 नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दीर्घकाळापासून दिल्ली सीमेवर आणि अन्य ठिकाणी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारची उदासीन भूमिका दुर्दैवी आहे. शेतकऱयांच्या मागण्यांकरता संवेदनशील होऊन का करण्यासाठी संसदेत दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचे मायावती म्हणाल्या.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. आर्थिक संकट निर्माण झाले आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर इत्यादींच्या किमती सातत्याने वाढत आहेत. महागाई गगनाला भिडू लागली आहे. केंद सरकारच्या निष्काळजीपणमुळे जनता त्रस्त असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. देशात कोरोना बाधितांना मदत आणि देशात लसीकरण करविणे अत्यंत आवश्यक आहे. बसप या सर्व मुद्दय़ांवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाबा विचारणार असल्याचे मायावतींनी म्हटले आहे.
ब्राह्मण मतपेढी
प्रसारमाध्यमांशी बोलताना मायावतींनी अखेरीस ब्राह्मण कार्ड पुढे केले आहे. भाजप सरकारच्या धोरणांमुळे जनता त्रस्त आहे. विविध प्रकारे प्रत्येक समाजातील लोकांचे शोषण होत आहे. विशेषकरून ब्राह्मण समाज दुःखी आहे. या समुदायाने भाजपच्या भुलथापांना बळी पडून एकतर्फी मतदान केले होते. ब्राह्मण समाजाचे लोक आता भाजपच्या थापांना बळी पडणार नाही. ब्राह्मण समाजाचे लोक बसपशी पुन्हा जोडले जातील अशी अपेक्षा असल्याचे मायावतींनी म्हटले आहे.
संमेलनाची तयारी
बसपच्या ब्राह्मण संमेलनाची सुरुवात अयोध्येतून 23 जुलै रोजी होणार आहे. बसपचे ब्राह्मण चेहरे सतीश चंद्र मिश्र यांच्याकडे ब्राह्मणांना एकत्र करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे संमेलन 2007 च्या निवडणूक प्रचारमोहिमेच्या धर्तीवर होणार आहे. लखनौमध्ये शुक्रारी राज्यभरातील 200 हून अधिक ब्राह्मण नेते आणि कार्यकर्ते बसप कार्यालयात पोहोचले होते. दलित-ब्राह्मण-ओबीसीच्या फॉर्म्युल्यासह मायावती 2022 च्या निवडणुकीत उतरणार आहेत. मायावतींनी 2007 मध्ये उत्तरप्रदेशच्या निवडणहुकीत 403 पैकी 206 जागा जिंकल्या होत्या. 30 टक्के मतांसह सत्ता प्राप्त करून देशाच्या राजकारणात त्यांनी खळबळ उडवून दिली होती.









