ऑनलाईन टीम / लखनऊ :
अयोध्या-लखनऊ महामार्गावर बाराबंकी येथे एका ट्रकने बंद पडलेल्या डबलडेकर खासगी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बससमोर झोपलेल्या 18 मजुरांचा चिरडून मृत्यू झाला तर 25 हून अधिक जण जखमी झाले असून, त्यांना लखनऊमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील लुधियाना येथून मजुरांना घेऊन जाणारी डबलडेकर खासगी बस मंगळवारी रात्री हायवेवर बाराबंकी जिल्ह्यातील रामस्नेहायत कोतवाली भागात बंद पडली होती. त्यामुळे बसमधील मजूर बस समोर झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री एका ट्रकने या बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बस पुढे झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेल्याने 18 मजुरांचा चिरडून मृत्यू झाला. या अपघातात 25 हून अधिक जखमी झाले आहेत.