राज्य पोलिसांचा दावा : हाथरस सामूहिक बलात्कारानंतर संकेतस्थळाची निर्मिती : जातीय दंगलीचा होता कट
वृत्तसंस्था/ लखनौ
हाथरसमध्ये दलित युवतीवर सामूहिक बलात्कार तसेच तिच्या मृत्यूनंतर उत्तरप्रदेशात जातीय दंगली भडकविण्याच्या कट रचण्यात आला होता असा खुलासा झाला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेनंतर एका रात्रीत ‘जस्टिस फॉर हाथरस’ या नावाने संकेतस्थळ तयार करण्यात आले होते. याद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाने चुकीची विधाने प्रसारित करत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रविवारी रात्री पोलिसांनी संकेतस्थळ आणि याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आहेत. लखनौच्या पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राज्यात जातीय आणि सांप्रदायिक उन्माद फैलावणे, अफवा आणि बनावट माहितीद्वारे अशांतता फैलावण्याचा कट रचण्यासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.
पीएफआयवर आरोप
संकेतस्थळावर स्क्रीनशॉटमध्ये बेकिंग न्यूज लिहून मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रासोबत त्यांच्या नावाने बनावट विधान प्रसारित करण्यात आले होते. ते स्क्रीनशॉट व्हॉट्सऍपसह अन्य समाजमाध्यम खात्यांद्वारे शनिवारी वेगाने प्रसारित करण्यात आले. पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) समवेत काही अन्य संघटना राज्यात वातावरण बिघडविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी केली जात असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.
विकास नको असणाऱयांचा हात
विकास न रुचणारे लोक देश आणि राज्यात जातीय, सांप्रदायिक दंगल घडवून आणू पाहत आहेत. या दंगलीमुळे विकास थांबून राजकीय पोळी भाजण्याची संधी मिळेल, असे वाटत असल्यानेच नवनवे कट रचले जात असल्याचे उद्गार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले आहेत.
संकेतस्थळ नंतर बंद
कटातील पीएफआय समवेत काही अन्य संघटनांच्या भूमिकेची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अशाप्रकारची बनावट पोस्ट प्रसारित करून पीडितेची जीभ कापल्याचा, अवयवांची खांडोळी केल्याचा आणि सामूहिक बलात्काराशी संबंधित अनेक अफवा पसरवून राज्यात द्वेष फैलावण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा अफवा फैलावण्यासाठी अनेक प्रमाणित समाजमाध्यम खात्यांचाही वापर करण्यात आला आहे. तपास यंत्रणा प्रमाणित खात्यांचा तपशील प्राप्त करत आहेत.
चिथावणी देण्याचा प्रकार
या संकेतस्थळावर पोलिसांच्या तावडीतून पळणे आणि निदर्शनांच्या पद्धतींसंबंधी माहिती देण्यात येत होती. तसेच अधिकाधिक संख्येत निदर्शनांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले जात होते. दंगल भडकविल्यावर अश्रूधूराच्या कांडय़ा आणि अटकेपासून कशाप्रकारचे वाचावे याचेही निर्देश संकेतस्थळावर देण्यात आले होते.
विखारी संकेतस्थळाद्वारे कट निदर्शनांच्या आड राज्यात जातीय दंगल भडकविणे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याच्या मोठय़ा कटाचा सुरक्षा यंत्रणांनी खुलासा केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सरकारनुसार संकेतस्थळाला इस्लामिक देशांकडून वित्तसहाय्य मिळत होते. ऍम्नेस्टी इंटरनॅशनलच्या भूमिकेचीही चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी यात चौकशी चालविली आहे.









