ऑनलाईन टीम / लखनौ
भारतातील कोरोनाचे संकट काहीसं कमी झाल्याची स्थिती असतानाच उत्तरप्रदेशातील वेगाने वाढणाऱ्या झिका विषाणूमुळे देशावर आणखी एक संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेशातील कानपुर येथे एकाच वेळी झिका विषाणूचे १४ रुग्ण आढळुन आले आहेत. यामध्ये एका गर्भवती महिलेचा ही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
यापुर्वी कानपूर शहरातल्या चकेरी भागात ही झिका विषाणूचे १ नोव्हेंबरला ६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सद्य स्थितीत होणारी वाढ ही चिंतेत भर टाकणारी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, एडीज डास दिवसा चावतात. याच डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचाही प्रसार होतो. झिका हा सर्वसाधारणपणे जीवघेणा विषाणू नाही पण गर्भवतींसाठी तसंच भ्रूणासाठी हा विषाणू धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे राज्य सरकार काहीअंशी याबाबतील सक्रिय झाले असले तरी केंद्र झिका विषाणूच्या बाबतीत तरी वेळेवर पावले उचलणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.