अध्याय अकरावा
भक्ताला उपयोगी अशी पुढची कथा भगवंत उद्धवाला सांगत आहेत. ते म्हणाले, फलाचा त्याग करून सर्व कर्म मला अर्पण करवत नसेल तर, माझी कथा श्रवण कर. हरिकथा ऐकत असताना तेथे काळाचा सुद्धा शिरकाव होत नाही आणि कर्मबंधनही होत नाही. ह्याकरिता हरिकथा जर श्रद्धेने श्रवण केली, तर त्याचंच नांव ‘काळाची सार्थकता’ असे समजावे. आता कथेचे माहात्म्य ऐक. श्रद्धायुक्त बुद्धीने जर कथा श्रवण केली, तर तिच्यातील प्रत्येक अक्षराने तिन्ही लोकातील पातकांचे भस्म होऊन जाते.
हरिकथेचे श्रवण करताना ज्याचे अर्थाकडे मन वेधलेले असते, त्यालाच श्रद्धेने श्रवण करणे असे म्हणतात. नास्तिकांच्या बोलण्यावर पाणी सोडून ज्याची आस्तिक्मयबुद्धि वाढत जाते, त्याची श्रद्धा श्रे÷ श्रद्धा होय, तिच्यामध्येच अप्रतिम सुख असते. श्रवणामध्ये किंवा ध्यानामध्ये लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद ह्यांनी विघ्न होत असते. ह्याकरिता हे चारही अपाय टाळावेत. हरिकथा ऐकतानासुद्धा मनाला जर विषय चिंतनाचीच गोडी लागून राहिलेली असेल, तर ती मुळीच श्रद्धा नव्हे. त्याचप्रमाणे प्रेम तीन प्रकारचे आहे. मोठमोठय़ा वीरांचा समरांगणांतील शूरपणा किंवा भयंकर युद्ध यांचे वर्णन ऐकून मन अत्यंत आनंदाने उचंबळून येते ते राजस प्रेम होय. दुखःशोकांचा प्रसंग, किंवा गेल्यामेल्यांची वार्ता, किंवा अत्यंत शोककारक कथा ही ऐकणेही ज्याला सहन होत नाही त्यांतील प्रत्येक प्रसंग ऐकत असता डोळय़ांतून अश्रृंच्या धारा लागतात, हुंदके देऊन थरथर कापू लागतो तो खरा तामस होय.
सगुणमूर्तीचे ऐश्वर्य, शंख, चक्र, कमळ, गदा, पीतांबर धारण केलेला गोविंद यांचे वर्णन श्रवण करून जो आनंदाने भरून जातो. नेत्रांतून आनंदाश्रु वाहतात, आलेला हुंदका हृदयांत आवरत नाही, मन कृष्णमय होऊन गेलेले असते, ते प्रेम सात्त्वीक होय. सात्वीक, राजस आणि तामसी प्रेमाचे प्रकार सांगितल्यावर भगवंत पुढे म्हणाले, ह्याहूनही आणखी एक चौथा प्रेमाचा प्रकार आहे. तो केवळ अर्तक्मय आहे. त्याबद्दल मुळीच तर्क चालावयाचा नाही. उद्धवा ! तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून तोही आता तुला सांगतो. तुझ्या भक्तीचे स्वरूप फार थोर आहे. ती मला गुप्त गोष्टसुद्धा बोलावयास लावते. त्यासाठी मला तुझ्याशिवाय दुसरी अधिकारी व्यक्ती ह्या सृष्टीमध्ये दिसतच नाही. श्रीकृष्ण म्हणाले, नीट लक्ष दे. निर्गुण परब्रह्माचे स्वरूप ऐकून ज्याचे मन चित्स्वरूपामध्येच बुडून जाते, त्याला पुन्हा देहभानावर येण्याची जाणीवच रहात नाही. ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात पडला म्हणजे तोही समुद्रासारखाच होऊन जातो, त्याप्रमाणे तोही प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. चित्त व चैतन्य ह्यांची मिठी पडली असता व लिंगदेहाची गाठ सुटली असता नेत्रांमध्ये अर्थात पूर येतो, सर्वांगावर रोमांच उभे राहतात. जीवभावनेची अवस्था खुंटते आणि अनिवार गहिवर येऊन गळा अगदी दाटून जातो. काही केले तरी शब्द बाहेर उमटत नाही. घामाचे लोटच्या लोट वाहू लागतात. नेत्र अर्धेन्मीलित होतात व जेथल्या तेथेच विकास पावतात. आश्चर्याचे भरते येते व स्वानंदाने तो भरून जातो. हा चौथा प्रेमाचा प्रकार होय. उत्तम भागवताची स्थिति अशी असते. ह्या स्थितीला जागणारा फक्त मीच आहे. निर्गुणामध्ये प्रेम उत्पन्न होणे हे शुद्ध सत्त्वाचे लक्षण आहे. याची खूण मी जाणतो, किंवा जे ब्रह्मस्वरूप असतात ते
जाणतात.
उध्दवा ! श्रद्धायुक्त श्रवण केले की, त्याच्या योगाने एवढा लाभ आहे हे लक्षात ठेव. श्रद्धेनं श्रवण केल्याचे माहात्म्य त्रैलोक्मयांतही फार मोठे आहे. विचारवंत आणि निरिच्छ वक्ता मिळाला तर श्रद्धेने कथा श्रवण करावी. किंवा ज्ञानसंपन्न श्रोता मिळाला तर स्वतःही कथा सांगावी. जेव्हा श्रोता आणि वक्ता हे दोन्ही नसतील, तेव्हा आपल्या मनाचाच आश्रय करावा आणि माझे अवतार, अवतारकृत्ये वगैरे जे काही आहे, त्यांचा एकटय़ानेच विचार करावा. विषयांची आस्था सोडून व कळिकाळासही टक्कर देऊन, माझ्या कीर्तनामध्ये उदास न होता अत्यंत उल्हास धारण करावा.
क्रमशः







