ऑनलाइन टीम / पुणे :
उत्तम नागरिक हे चांगल्या शिक्षणातूनच घडू शकतात. शिक्षणातून समाजातील सर्व प्रक्रिया उत्तम प्रकारे कार्यान्वित होतात. बुद्धयांकापेक्षा भावनांक जास्त असणारी मुले पुढे जातात. यासाठी चाईल्ड फे्रेंडली आणि बिनभिंतीची शाळा आवश्यक आहेत, यामाध्यमातूनच मुलांचा विकास होऊ शकतो. भारतात सर्व काही आहे, परंतु भारताची सर्वात मोठी गरज ही उत्तम नागरिक जास्त असणे ही आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अ.ल. देशमुख यांनी व्यक्त केले.
‘मुलांनी मुलांसाठी चालविलेली चळवळ’ असे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात जुन्या स्काऊट-गाईड खुल्या पथकांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाच्या १०१ व्या वर्षानिमित्त टिळक स्मारक मंदिर येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख, प्रसिद्ध रंगकर्मी रविंद्र खरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा योगिनी जोगळेकर, नरेंद्र धायगुडे, शिवाजी कुलाच्या कार्यकारी कुलमुख्य श्रेया मराठे, समितीप्रमुख किर्ती कांबळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेच्या कुलवार्ता या अंकाचे प्रकाशन देखील झाले.
डॉ.अ.ल. देशमुख म्हणाले, माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे हे शिकवणारी शिवाजी कुल ही संस्था आहे. वयवर्षे ३ ते ९० या वयोगटातील माणसे एकत्र काम करणारी भारतातील ही एकमेव संस्था असावी. मुले ही रागीट होत आहेत असे आपल्याला वाटते. परंतु कोणताही मुलगा रागीट नसतो. ती अस्थिर असतात. हे दूर करायचे असेल आणि चांगल्या पद्धतीने समाजात आणायचे असेल. तर त्याचे मूळ शोधायला हवे. औपचारीक शिक्षणात अनौपचारीक शिक्षणाची भर घातली तर तयार होणारा विद्यार्थी उत्तम पद्धतीने तयार होईल. त्यामुळे शिवाजी कुल सारख्या संस्थेची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.