आजपासून कित्येक हजार वर्षांनी इथे नवी संस्कृती उदयाला आली आणि त्यांनी उत्खनन केले तर त्यांना आपल्या काळातल्या आढळलेल्या गोष्टींवरून इतिहासकार पुढील तर्क करतील. प्राचीन काळी येथे कोरोनाची साथ आल्यावर सर्वजण मास्क लावू लागले. सिनेमांमध्ये लेडीज नायिका नाजूक प्रसंगी चेहऱयावरचा घुंघट वर करून डोक्मयावर ठेवीत, त्याप्रमाणेच जेंट्स लोक महत्त्वाच्या प्रसंगी (म्हणजे थुंकताना, धूम्रपान करताना किंवा नुसतं बोलताना) मास्क बाजूला करून हनुवटीवर घ्यायचे. कोरोनाच्या कालखंडात अनेक पुरुषांनी दाढी करणे सोडून दिले होते. कारण दिवसातला बराच वेळ त्यांचे मास्क हनुवटीवरच असत. मास्कला रंगांचे बंधन नव्हते. पण काळे मास्क पुरुषांमध्ये लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांची दाढी वाढली आहे की हनुवटीवर मास्क आहे हे कळायला मार्ग नसे. भारतात पुणे नावाचे एक शहर होते. तिथल्या एका कल्पक व्यक्तीने ओठांवरचा मास्क दूर न करता धूम्रपान करता येईल, रस्त्यावर उभे राहून चहा पिता येईल असे ‘पेरीस्कोप’ सारखे यंत्र बनवले होते. त्याचे एक टोक तोंडात आणि दुसरे टोक मास्कच्या बाहेर असे. बाहेरच्या उघडय़ा टोकातून हव्या त्या चीजांचा पुरवठा करता येई. कोरोनाची साथ येण्याआधी पुण्यात आलेली फॅशन म्हणजे अवाच्या सव्वा पैसे मोजून चुलीवरच्या पुरणपोळय़ा, चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचे पिठले/मटन, चुलीवरचा चहा वगैरेचा आस्वाद घेणे. त्यामुळे कोरोना आल्यानंतर सोशल मीडियावर बातमी पसरली होती की पुण्यात कुठेतरी ‘चुलीवरचे मास्क’ मिळतात. पण उत्खननात तसे मास्क कुठे मिळाले नाहीत.
कोरोनाची लागण लिंगभेदनिरपेक्षपणे होत असल्याने लेडीज महिला देखील मास्क वापरायच्या. मास्क बहुधा अंगावरच्या वस्त्राच्याच रंगांशी जुळणारे असत. घरून निघताना मास्क विसरला तर ओढणीचेच मास्कमध्ये रूपांतर करायच्या. पुरुषांप्रमाणे त्यांना रस्त्यावर थुंकायची किंवा धूम्रपान करायची सवय नसावी. त्यामुळे त्यांना रस्त्यावरून चालताना मास्क बाजूला करायची गरज नसे. मोबाईलवर बोलताना देखील त्या मास्क बाजूला करीत नसत. साडय़ा वगैरेच्या कल्पक दुकानदारांनी ओढणीबरोबर त्याच रंगाचे मास्क आणि साडीबरोबर मॅचिंग ब्लाऊज पीस व मास्क द्यायला सुरुवात केली होती. मकर संक्रांतीपर्यंत कोरोनाची लाट राहिली असती तर वाण म्हणून मास्क देखील लुटायची तयारी झालेली होती. पण तोवर कोरोना राहिला की नाही हे उत्खननावरून समजत नाही.








