‘तरुण भारत’ च्या वृत्तानंतर तहसीलदारांनी उगारला दंडुका, मार्ली डोंगरात केले होते उत्खनन
वसीम शेख/ कुडाळ
जावली तालुक्यातील इको सेन्सिटीव्ह झोन ओळखल्या जाणाऱया मार्ली डोंगरात मुंबईच्या एका पाटलाने केलेल्या बेसुमार उत्खननाबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी उत्खननाचा आढावा घेत जमीन मालक राजू नाना पाटील व सौ. मिनाक्षी राजू पाटील यांना तब्बल 15 लाख 30 हजारांचा दंड ठोठावला. तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी उगारलेल्या या दंडुक्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच ‘तरुण भारत’ने मांडलेल्या वृत्ताबाबत जावली तालुक्यातून कौतुक होत आहे.
मार्लाच्या डोंगरावर प्रशासनाच्या नाकावर टिचून मुंबईच्या एका पाटलानं भलं मोठं उत्खनन करून पोकलेनच्या साह्याने भला मोठा डोंगर पोखरला होता ही बाब ‘तरुण भारत’ने आपल्या परखड बातमीच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणल्यानंतर जावळी तालुक्याचं महसूल विभाग खडबडून जागं झालं. जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी यंत्रणा कामाला लावत उत्खननाचा आढावा घेत संबंधितांवर दंडुका उगारला. जमीन मालक राजू नाना पाटील व सौ. मिनाक्षी राजू पाटील यांनी केलेला अनाधिकृत उत्खननावर 15 लाख तीस हजार रुपयाचा दंड ठोठावला.
तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्ला येथील राजू नाना पाटील व सौ. मिनाक्षी राजू पाटील यांची जमीन गट नंबर 39 17 क्षेत्र झिरो 97 आर या क्षेत्रात अनाधिकृतरित्या जमिनीचे मोठय़ा प्रमाणात डोंगर पोखरून उत्खनन केले व येथील गौणखनिज याची वाहतूक देखील केली असल्याची पंचनाम्यात निदर्शनास आली. यावरून गावकामगार तलाठी यांनी सदर पंचनामा करून तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्या दप्तरी सादर केला. यावरून तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी घटनास्थळी येऊन 15 लाख तीस हजार रुपयांचा दंड या उत्खननावर दंडात्मक कारवाई केली आहे.
मार्ली डोंगरात वास्तविक हे उत्खनन दोन ते तीन महिन्यापूर्वी झाले होते. यावर अद्यापही जावळी महसूल विभागाची कारवाई झाली नव्हती. मात्र ‘तरुण भारत’ने जावळी तालुका महसूल विभागाच्या डोळ्यात अंजन घातलं व परखड बातमी प्रसिद्ध केल्यानंतर महसूल विभागाला जाग आली व त्यानंतर महसूल विभागाने या उत्खननावर कारवाई केली.
संबंधित राजू पाटील व मिनाक्षी पाटील हे मुंबईकरांनी या इको सेन्सिटिव्ह झोनमधील मार्लीचा डोंगर पोखरून जावळी प्रशासनाला चॅलेंज दिला होता मात्र या चॅलेंज दिले होते. परंतु प्रशासनाने राजू पाटलांचे चॅलेंज मोडित काढत दंड ठोठावला.








