तिसऱया रेल्वेगेट कामाबाबत माहिती : रॅम्प बनविण्याचे काम युद्धपातळीवर : 56 मीटर लांबीचे लोखंडी स्पॅन घालणार
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे तिसऱया रेल्वेगेटवर उभारण्यात येणाऱया उड्डाणपुलाचे काम रखडले होते. 8 महिन्यांत तयार करण्यात येणाऱया या उड्डाणपुलाचे काम तब्बल दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र सध्या या कामाला सुरुवात झाली असून रॅम्प बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच रेल्वेमार्गादरम्यानचे गर्डर तयार करण्यात येत आहेत.
उड्डाणपुलाचे काम रखडल्याने परिसरातील व्यावसायिकांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. तसेच या ठिकाणी मातीचे ढिगारे, रस्त्यावर खोदाई आणि विविध साहित्य टाकण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. परिणामी दररोज वाहतूक केंडीच्या समस्येला वाहनधारकांना तेंड द्यावे लागत आहे. कोरोना विषाणू प्रसारामुळे परराज्यातील सर्व कामगार आपल्या गावी गेले होते. तसेच तज्ञ कामगार उपलब्ध नसल्याने उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम ठप्प झाले होते. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर कामकाज सुरू करण्यात आले होते. पण केवळ पुलाच्या
स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. पुलावरील दोन्ही बाजूने कठडे उभारणे, फुटपाथ निर्माण करणे व रॅम्प बनविणे अशी कामे रखडली होती.
रेल्वेमार्गादरम्यान 56 मीटर लांबीचे लोखंडी स्पॅन घालण्यात येणार असून याकरिता गर्डर तयार करण्याचे कामही यापूर्वी हाती घेण्यात आले होते. सध्या एका बाजूच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱया बाजूच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मात्र सुरू असलेले काम पूर्ण होण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागला आहे. उर्वरित काम पूर्ण करून दुसऱया बाजूच्या उड्डाणपुलाचे काम करण्याकरिता किती वर्षांचा कालावधी लागणार? असा मुद्दा उपस्थित होत आहे. हे काम बंद राहिल्याने उड्डाणपुलाची उभारणी पंचवार्षिक योजनेंतर्गत करण्यात येत आहे का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
स्पॅन बसविण्यासाठी महिन्याचा कालावधी लागणार
उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने याची पूर्तता तातडीने करावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे सदर काम सुरू करण्यात आले असून दोन्ही बाजूंनी कठडे उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच पुलाजवळ रॅम्प निर्माण करण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. पावसाळय़ात स्विमिंगपूलचे स्वरूप आले होते. आता त्या ठिकाणी रॅम्प उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन्ही बाजूचे रॅम्प निर्माण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर पुलावर रस्ता केला जाणार आहे. 56 मीटर लांबीचे गर्डर तयार करण्यात येत आहेत. सदर स्पॅन बसविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे कंत्राटदाराने सांगितले. जानेवारी अखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. त्यादृष्टीने कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे.









