धारवाड रोड परिसरातील नाला बनला धोकादायक
प्रतिनिधी/ बेळगाव
धारवाड रोड येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र रूपाली थिएटर ते रेल्वे फाटकापर्यंत माणिकबाग समोरील सर्व्हिस रस्त्याचे काम करण्यात आले नाही. सदर सर्व्हिस रस्त्याचे काम महापालिका करणार असल्याचे सांगून रेल्वे खात्याने आपली जबाबदारी झटकली आहे. मात्र, सर्व्हिस रस्त्याचे काम कोण करणार याबाबत माहिती देण्यास महापालिकेने टाळाटाळ चालविली आहे. परिणामी रस्त्याअभावी वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करून रेल्वे फाटकावर होणाऱया गर्दीवर पर्याय निर्माण केला. पण रेल्वे उड्डाणपुलाशेजारील सर्व्हिस रस्ता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. केवळ एका बाजूचा सर्व्हिस रस्ता करून दुसऱया बाजूचा रस्ता करण्याबाबत रेल्वे खात्यासह महानगरपालिकेने जबाबदारी झटकली आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन अडीच वर्षे झाली. पण सर्व्हिस रस्ता निर्माण करण्याबाबत कोणत्याच हालचाली नाहीत. परिणामी परिसरातील व्यावसायिक आणि शहरातील नागरिकांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. माणिकबाग समोरील सर्व्हिस रस्ता निर्माण करण्याबाबत महापालिकेने कोणती कारवाई केली आहे, अशी माहिती महाद्वार रोड येथील रहिवासी एम. बी. चौगुले यांनी महापालिकेकडे माहिती हक्क अधिकाराखाली विचारली असता सदर माहिती विचारता येत नसल्याचे उत्तर महापालिका प्रशासनाने देऊन रस्ता निर्माण करण्याच्या प्रकरणावर पडदा टाकला आहे.
चौगुले यांनी रेल्वे खात्याकडेही याबाबत माहिती हक्क अधिकाराखाली विचारणा केली होती. सदर सर्व्हिस रस्त्याचे काम का करण्यात आले नाही. हे काम कधी पूर्ण होणार अशी माहिती विचारली होती. सदर उड्डाणपुलाचे काम 31 मार्च 2017 पूर्वी पूर्ण करून रस्ता खुला केला आहे. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेत उड्डाणपुलाची उभारणी आणि एका बाजूचा सर्व्हिस रस्ता केला आहे. मात्र, दुसऱया बाजूला नाला असून नाल्यावरील स्लॅब पूर्णपणे खराब झाले आहे. सदर नाल्याचे पुनर्बांधकाम करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी महापालिकेची असल्याचे उत्तर द-प रेल्वे विभागाने दिले आहे. त्यामुळे सर्व्हिस रस्ता निर्माण करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर जबाबदारी पार पाडण्याकडे महापालिकेने टाळाटाळ चालविली आहे. सर्व्हिस रस्ता निर्माण करण्याबाबत विचारलेली माहिती रेल्वे खात्याने दिली. पण महापालिकेने माहिती देण्यास टाळाटाळ करून माहिती विचारण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शहरवासियांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले असून त्यामुळेच सर्व्हिस रस्त्याबाबत माहिती देण्यास उदासीनता दर्शविली असल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपुलाशेजारील रस्त्याचे काम रखडले आहे. नाल्याचे स्लॅब कोसळले असल्याने ये-जा करणाऱया नागरिकांना आणि व्यावसायिकांना धोकादायक बनले आहे. या ठिकाणी कोणताही अनर्थ घडल्यास महापालिका जबाबदार राहणार आहे. त्यामुळे रस्ता निर्माण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.









