गुजरी कॉर्नर येथे दर्शन रांगेत उभारणी, येण्या-जाण्यासाठी झाली सोय
प्रतिनिधी/कोल्हापूर
नवरात्रोत्सवात भाविक आणि स्थानिक अंबाबाई देवीच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात येणार, गर्दी होणार या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स उभारले होते. मात्र अयोग्य पद्धतीने बॅरिकेड्स उभारल्यामुळे राजाराम रोड, जोतिबा रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोड येथील व्यापारी आणि स्थानिकांमध्ये नाराजी पसरली होती. आझाद गल्ली ते गुजरी हा रस्ता बॅरिकेड्स टाकल्यामुळे बंद झाल्याने परिणामी स्थानिकांना शिवाजी चौकातून फिरून यावे लागत होते. तसेच गुजरीतील दुकाने उघडी असूनही ग्राहकांना इथे यायला मार्गच नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती. अखेर पोलीस प्रशासनाने शिवाजी चौक ते भवानी मंडप मार्गावर (दर्शन रांग) शुक्रवारी तात्पुरता उड्डाणपूल (स्कायवॉक) उभारल्याने स्थानिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांनी समाधान व्यक्त केले.
नवरात्रोत्सवाचे पहिले दोन दिवस गुजरी, जोतिबा रोडवरील व्यापारी, स्थानिक आणि पोलीस प्रशासनामध्ये वादाचे प्रसंग घडत होते. अयोग्य पद्धतीने बॅरिकेड्स लावल्यामुळे स्थानिकांची अवस्था `काखेला कळसा आणि गावाला वळसा’ अशी झाली होती. दुकाने उघडी असूनही येण्या-जाण्याला मार्गच नसल्याने ग्राहकच फिरकत नसल्याने व्यवसाय हेणार कसा, असा प्रश्न व्यापाऱयांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार चंद्रकांत जाधव यांनी येथील परिसराची पाहणी केली. त्यांनी स्थानिक आणि व्यापाऱयांच्या भावना समजून घेतल्यानंतर भाऊसिंगजी रोडवरील गुजरी कॉर्नर (आझाद गल्ली ते गुजरी) येथे तात्पुरता उड्डाणपूल उभारण्याचे आदेश दिल्यानंतर तिथे उड्डाणपूल उभारला. दरम्यान, शिवाजी चौकात ई पास तपासणी कक्षाजवळ उड्डाणपूल उभारल्याचा माहिती फलक लावला आहे.
दिवसभरात मंदिर परिसरातील अंतरंग…
ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांचे अंबाबाईचे दर्शन शिस्तबद्ध पद्धतेने सुरू होते. दर्शन रांगेत गर्दी नसली तरी भाविकांची एकसारखे येणे सुरूच होते. महाद्वार येथे मुखदर्शनासाठी गर्दी होती. पुढे सरकत राहा, असे आवाहन पोलीस सतत भाविकांना करत होते. मंदिर आवारात थोडी विश्रांती मिळाल्यानंतर पोलिसही नाश्ता करत होते. दर्शन घेऊन बाहेर पडताना अनेक भाविकांना सेल्फीचा मोह आवरता येत नव्हता. ठिकठिकाणी अनेक जण सेल्फी काढत होते.
येण्या-जाण्यासाठी मार्ग खुला
तात्पुरत्या स्कायवॉकमुळे आझाद गल्ली ते गुजरीतील स्थानिक आणि व्यापाऱयांना येण्या-जाण्यसाठी सोयीचे झाले. भाविकांनाही गुजरीत खरेदीसाठी जाता येणार आहे. हा निर्णय दोन दिवसांपूर्वीच घ्यायला हवा होता. – सुहास झोपडेकर, सराफ व्यावसायिक
स्थानिक-व्यापाऱ्यांना दिलासा
दोन-तीन दिवसांपासून अयोग्य बॅरिकेड्समुळे जो वाद निर्माण झाला होता तो मिटला आहे. पोलिसांनी स्कायवॉक उभारल्यामुळे स्थानिक आणि व्यापाऱयांनाही आता ये-जा करता येऊ लागले आहे. – शिवराज नाईकवडी, सचिव, देवस्थान समिती