कणकवलीतील स्थितीमुळे हायवे एजन्सीच्या कामाचा दिखावूपणा पुन्हा उघड
पुलावरील रस्त्याला तडे, बॉक्सेल पुलाची भिंत धोकादायक
अधिकाऱयांकडून तातडीने पाहणी
दुर्घटना घडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
प्रतिनिधी / कणकवली:
शहरातील एसएम हायस्कूल ते गांगोमंदिरच्या पुढेपर्यंत उड्डाणपुलाला जोडणाऱया बॉक्सेल ब्रिजची भिंत पिलरपासून बाहेर आल्याने धोकादायक स्थिती झाली होती. याबाबत प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार यांनी प्राधिकरणच्या प्रतिनिधींसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच तातडीने धोकादायक भिंती काढून काम सुस्थितीत करण्याच्या सूचना देत काम सुरुही करण्यात आले. मात्र, संपूर्ण भिंतच धोकादायक झालेली असून पुढील कालावधीत ती पूर्णत: काढून नव्याने काम करावे लागणार आहे. यावेळी एसएम हायस्कूल ते जानवलीनदीपर्यंतच्या भागातील समस्या, नदीपात्रात टाकलेले दगड व माती, अनेक ठिकाणी कललेली बॉक्सेलची भींत याबाबत पाहणी करण्यात आली. नदीपात्रातील माती, दगड दोन दिवसांत काढण्याचे आदेशही प्रांताधिकाऱयांनी दिले. यावेळी कणकवलीकर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुर्घटना घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकाऱयांनी दिला.
प्रांताधिकारी, तहसीलदारांनी केलेल्या पाहणीच्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे गणेश महाजन, मुकेश साळुंखे, ऍड. नारायण देसाई, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सुजीत जाधव, बाळू मेस्त्राr, विनोद मर्गज, प्रदीप मांजरेकर, शशी राणे अमीत आवटी, सुरेश परुळेकर, संजय देसाई, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी व इतर उपस्थित होते.
कामात प्रगती न झाल्याने नाराजी
उड्डाण पुलाला जोडणाऱया या बॉक्सेलच्या भिंतीबाबत तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी ही भिंत एका बाजूने कलल्याचे दिसून आले. तेथील सर्व्हिस रोडवरून वाहने जात असल्याने भिंत कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. याप्रकाराबाबत कणकवलीकर संतप्त झाले होते. हायवेच्या समस्या मार्गी लावण्याबाबत सूचना देऊनही अद्याप कामात प्रगती झालेली नसल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.
धोका उद्भवण्याची भीती
यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी कणकवलीकरांच्या उपस्थितीत एसएम हायस्कूल ते जानवली नदीपर्यंत तसेच उड्डाणपुलाला जोडणाऱया रस्त्याच्यावर जाऊन पाहणी केली. पुलाला वरून तडे गेलेले असल्याने आतमध्ये पाणी जाऊन बॉक्सेलच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे. जवळपास 10 ते 12 ठिकाणी बॉक्सेल भिंत कललेली असल्याचे दिसून आले. यात एसएम हायस्कूलजवळील धोकादायक भाग तातडीने काढून भिंत सुस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार वाहतूक थांबवून तातडीने सपोर्टसाठी भिंतीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, या बॉक्सेल भिंतीची संपूर्ण बाजूच धोकादायक आहे. पुढील काळात यापासूनही धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण भींतच काढून पुन्हा काम करावे लागणार आहे.
नदीपात्र मोकळे करण्याच्या सूचना
दुसरीकडे जानवलीनदीपात्रात दगड व माती टाकलेली असल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडचण निर्माण झाली. परिणामी महाजनीनगरसह लगतच्या रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. याबाबतही पाहणी करत ठेकेदार प्रतिनिधींना धारेवर धरण्यात आले. कोणत्याही स्थितीत दोन दिवसांत ही कार्यवाही करून नदीपात्र मोकळे करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱयांनी दिल्या.
यावेळी अशोक करंबेळकर, बाळू मेस्त्राr, ऍड. नारायण देसाई, सुजीत जाधव यांनी ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या निष्काळजीपणाबाबत पोलिसांत तक्रार देण्याचा इशाराही देण्यात आला.
ठेकेदार व हायवेचे अधिकाऱयात समन्वय नाही!
या पाहणीनंतर प्रांताधिकारी सौ. राजमाने यांनी सांगितले की, एसएम हायस्कूलजवळीला कललेली भिंत सुस्थितीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, उड्डाणपुलाला वरून तडे गेल्याने काही ठिकाणी पाणी आत जात भिंतीला धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रातील माती, दगड काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठेकेदार व हायवेचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येते. यासंदर्भात मंगळवारी हायवेच्या कार्यकारी अभियंत्यांना बैठकीला बोलावण्यात आले आहे. यावेळी पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच हे काम करताना क्वालिटी कंट्रोलचा माणूस असावाच अशा सूचनाही आपण देणार आहे. दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाहीच्या सूचना नॅशनल हायवेचे अधिकारी व ठेकेदाराच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत. मात्र, दुर्दैवाने काही घडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.









