प्रतिनिधी / सातारा
बसचे चाक पंक्चर झाल्याने उडतारेनजीक महालक्ष्मी हॉटेलजवळ थांबवून चालक चाक काढत असता बसमधील क्लिनर मदत करत होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याची घटना घडली. त्यात क्लिनर सुनील शिवाजी शिंदे हे जखमी झाले असून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि.28 रोजी पहाटे साडे चार वाजता उडतारे नजीक पुणे ते सातारा रोडवर महालक्ष्मी हॉटेलजवळ बस क्रमांक एम एच 43 एच 5700 चा टायर बदलण्यासाठी गाडी थांबवली होती. चालक अस्लम मैनुद्दीन मुल्ला हे चाक काढत होते. तर त्यांना क्लिनर सुनील शिंदे हे मदत करत होते. त्याचवेळी मालट्रक एमएच 46-6103 ने पाठमागून धडक दिली. त्यात सुनील शिंदे हे जखमी झाले. त्याची फिर्याद अस्लम मैनुद्दीन मुल्ला यांनी दिली असून ट्रक चालक इतियाज अहमद शब्बीर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून भुईंज पोलिस ठाण्यातील हवालदार शिवाजी तोरडमल तपास करत आहे.