जानेवारी महिना संपत आला. आताच खरे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेध लागतात आणि विद्यार्थी आपल्या वर्षभरातल्या मेहनतीवर शेवटचा हात फिरवायला लागतात. अर्थात, ज्याने वर्षभर मेहनत केली असेल त्यांच्याच बाबतीत हा मुद्दा येतो. ज्यांच्या शाळांमध्ये पुरेसे चांगले शैक्षणिक वातावरण नसेल आणि घरातूनही अभ्यासाचा फार तगादा नसेल, अशा विद्यार्थ्यांनी वर्षभरात फार कसून मेहनत केलीही नसेल, त्यामुळे असे विद्यार्थी आत्ता अभ्यासाला लागले असतील. एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचे टेन्शन वाढायला लागलेले आहे. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांनी काय करावे, याबाबत सर्वच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळतेच असे काही सांगता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या मनात आता नेमके काय करावे, याविषयी बराच संभ्रम असतो.
त्यांच्या शाळांतील अध्यापनही जवळपास बंद झालेले असते आणि विद्यार्थ्यांनी स्वत: परीक्षेची तयारी करावी म्हणून त्यांना सुट्टी दिलेली असते. अशा विद्यार्थ्यांनी आता परीक्षेची तयारी म्हणून नेमके काय करावे, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि हे विद्यार्थी गाईडसुद्धा बाजूला ठेवून अपेक्षित प्रश्नाच्या उत्तरांची उजळणी करायला लागतात. त्यांच्यासमोर दुसरा मार्ग नसतोच. मात्र त्यांनी हे सारे करताना दिवसातले तीन तास निरनिराळय़ा प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी दिले पाहिजेत. परीक्षेच्या तोंडावर हीच तयारी अपेक्षित आहे. या प्रश्नपत्रिका सोडवताना त्या आपल्या वेळेवर सोडवता येतात की नाही, याची चाचणी त्यांनी स्वत: घेतली पाहिजे. परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवायला तीन तास वेळ मिळतो. परंतु घरी आपल्याला तेवढय़ा वेळात ती सोडवता येत नसेल, तर तसे का होते, याचे आत्मपरीक्षण करावे.
अनेकदा मनावर येणाऱया तणावामुळे असे होते. प्रश्नपत्रिकेत एखादा अनपेक्षित प्रश्न आला किंवा प्रश्न फिरवून विचारलेला असला की, तो प्रश्न वाचूनच तणाव वाढतो. तेव्हा अशा स्थितीत तरीही तीन तासात प्रश्नपत्रिका सोडवून व्हावी, यासाठी काय करावे लागेल, याचा विचार आपल्याला घरी या प्रश्नपत्रिका सोडवताना करता येईल. असा एखादा अनपेक्षित प्रश्न आला तर त्याच्यावर लक्ष न देता आपल्याला सोपे वाटणारे प्रश्न आधी सोडवायला घेतले पाहिजेत. हे तंत्र पुढे तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरते.
परीक्षांच्या बाबतीत जागरूक असणाऱया शाळा आणि शिकवणी वर्गांमध्ये अशा प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात आणि त्या दहावी-बारावी परीक्षा मंडळाच्या पद्धतीने तपासून घेतल्या जातात, त्यात असणाऱया त्रुटी विद्यार्थ्यांना दाखवल्या जातात. पण या सुविधा उपलब्ध नसणाऱया विद्यार्थ्यांनी आपल्या सरावासाठी सोडविलेल्या उत्तरपत्रिका अनुभवी शिक्षकांकडून तपासून घ्याव्यात. महिनाभरात ही तयारी आवश्यक आहे.









