उपायांसाठी सरसावले सोलापूरसह पुणे, नगरमधील जलतज्ञ
सोलापूर / रजनीश जोशी
अप्पर भीमा क्षेत्रातील प्रचंड घाण उजनी धरणात दरदिवशी साठत आहे, मात्र या पाण्यावर अवलंबून असलेल्या सुमारे 45 लाख लोकांमध्ये अजिबात जागरूकता नाही. ती निर्माण करण्यासाठी ’आओ, भीमा-उजनी को जाने’ या नावाने एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. तीत सोलापूरसह पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर जिह्यातील जलतज्ञ आणि अभ्यासकांचा समावेश आहे. या मोहिमेत जलतज्ञ नरेंद्र चुग, भारत मल्लाव, शैलजा देशपांडे, सारंग यादवाडकर, विनोद बोधनकर, डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, वैजिनाथ लोखंडे, अंकुश नारायणकर, अनिल पाटील यांचा सहभाग आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दररोज लाखो लिटर सांडपाणी मुळा-मुठेसह विविध नद्यांमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता सोडून दिले जाते. या नदीच्या काठाने जाताना घाण वासामुळे नाक अक्षरशः मुठीत धरावे लागते. एखाद्या गटारीप्रमाणे नदीच्या प्रवाहावरून मैला तरंगत जाताना दिसतो. पुणे जिह्यातील या सगळय़ा नद्या पुढे भीमेमध्ये मिसळतात. ही घाण उजनी धरणात साठते. तीच गोष्ट औद्योगिक वसाहतींमधून येणाऱया रासायनिक सांडपाण्याची. कुरकुंभसह अप्पर भीमा क्षेत्रातील अनेक उद्योगांचे रासायनिक सांडपाणी भीमेवाटे उजनी धरणात साठते. धरण जलाशय परिसरातील गावकरी-नागरिकांच्या आरोग्यावर त्यामुळे वाईट परिणाम होत आहे. हे सगळे तातडीने थांबणे गरजेचे आहे. मात्र, ज्या सोलापूरकरांना या घाणीचा सर्वाधिक त्रास होत आहे, त्यांच्याकडून यावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त होत नाही. यासाठी जनजागृती, कायदेशीर लढा, राजकीय नेत्यांकडून कृती, जलसंपदा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळासह सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱयांशी चर्चा अशा माध्यमातून ’आओ, भीमा-उजनी को जाने’ ही मोहीम राबवली जाणार आहे.









