प्रा.दिलीप धारगळकर यांची मागणी
पणजी /प्रतिनिधी
उच्चमाध्यमिक विद्यालयातील शिक्षकांवरील अन्याय दूर करावा. त्यांच्या न्याय्य मागणीसाठी त्यांच्यावर रस्त्यावर उतरण्याची पाळी सरकारने आणू नये असे अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिलीप धारगळकर यांनी सरकारला आवाहन केले आहे.
मिरामार पणजी येथील युथ हॉस्टेल मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान कार्यकारिणी सदस्य प्रा. अनंत पिसूर्लेकर, उपाध्यक्ष प्रा. विठोबा बगळी, प्रा. सुनील शेट उपस्थित होते.
सरकारकडून उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांवर अन्याय होत आहे. शिक्षकाची नोकरी केवळ आर्धवेळ असल्यामुळे बहुतेक शिक्षकांकडे रिकामा वेळ असतो असा शिक्षकांवर वरचेवर आरोप केला जातो हे आत्यंत चुकीचे आहे. उलट शिक्षकाला सरकारकडून पूर्णपणे वेठीस धरले जाते. कोविडच्या काळात शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन पद्धतीने जरी शिकवावे लागले असले तरी त्यासाठी त्याला पूर्वतयारी करावी लागत होती. इंटरनेट सेवा उपलब्धतेसाठी त्याला खूपच कष्ट घ्यावे लागले पदरमोड करावी लागली, असे प्रा. धारगळकर यांनी सांगितले.
याचबरोबर कोविड काळात शिक्षकांना स्वस्त धान्य दुकानातही काम करावे लागले. आतातर प्रशिक्षणाच्या नावाखाली त्यांना नि÷ा, दीक्षा अशात तासनतास जुंपले जात आहे. रोजची शिक्षकाची डय़ुटी करूनही इंटरनेट साधन सुविधा नसताना त्याला प्रशिक्षण पूर्ण करावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिक्षकांना निवडणूक डय़ुटी, सर्वेक्षणाचे काम दिले जाते. शिक्षकांची मानहानी होईल अशा कामात त्यांना गुंतवू नये असे झाल्यास यापुढे शिक्षक निवडणूक डय़ुटी करणार नाही. याबाबत आम्ही निवडणूक अधिकारी, शिक्षण संचालक याना निवेदने सादर केल्याचे त्यांनी सांगितले
याशिवाय शाळा तसेच उच्च माध्यमिक विद्यालयात गेली अनेक वर्षे तुटपुंज्या मोबदल्यात तासिका तसेच कंत्राटी पद्धतीवर राबवून घेणे थांबवावे. त्यांना सेवेत कायम करावे. विद्यमान मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री शिक्षकांच्या या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करतील त्यांच्यावर रस्त्यावर उतरण्याची पाळी येवू देणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संघटनेचे माजी अध्यक्ष अनंत पिसुर्लेकर यांनी यावेळी सांगितले की कोविडमुळे यावषी शाळा उशिरा सुरू झाल्या. त्यात प्रत्यक्षात वर्ग सुरू होण्यास दिवाळी यावी लागली. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यात वारंवार अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीत बदल केला जात आहे. साधन सुविधा उपलब्ध होत नाहीत. गोवा शालांत मंडळाने गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला विश्वासात घेवून परीक्षा धोरण राबवावे. शिक्षकांना त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी असे, उपाध्यक्ष सुनील शेट म्हणाले.









