कथाकार हिंमत पाटील यांची उपस्थिती
प्रतिनिधी / बेळगाव
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून आपल्या विनोदी शैलीत कथाकथन सत्रात कथा गाजविणारे हिंमत पाटील हे उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित विसाव्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाला रविवार दि. 24 जानेवारी रोजी दुसऱया सत्रात आपली कथा सांगण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी तमाम मराठी साहित्यप्रेमींनी या संमेलनाला उपस्थित राहून साहित्याचा आस्वाद घ्यावा, असे अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर यांनी कळविले आहे.
सीमाभागातील मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे, या भागात नवीन साहित्यिक निर्माण व्हावेत, युवक-युवतींना वाचन, लेखानाची आवड निर्माण व्हावी आणि मराठी साहित्याचा प्रसार व्हावा, यासाठी गेली 19 वर्षे उचगाव मराठी साहित्य अकादमीतर्फे खटाटोप केला जात आहे. मात्र यावर्षी कोरोनामुळे हा सोहळा साधेपणाने व परंपरा खंडित होवू नये, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणार आहे.
निसर्गरम्य आमराईतील जागृत मळेकरणी देवीच्या प्रांगणात भव्य-दिव्य होणारे साहित्य संमेलन यावषी अतिशय साधेपणाने होणार आहे. मात्र संमेलनाचा दर्जा कायम टिकविण्यासाठी तीन सत्रात प्रा. डॉ. अच्युतराव माने, हिंमत पाटील व निमंत्रितांचे कविसंमेलन अशा दर्जेदार सत्रांची निवड केल्याची माहिती अकादमीचे उपाध्यक्ष कृष्णाजी कदम-पाटील, सेपेटरी एन. ओ. चौगुले यांनी दिली आहे.
मळेकरणी देवीच्या निसर्गरम्य आमराईत होणाऱया साहित्य संमेलनाला सर्व साहित्यप्रेमी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे अकादमीने कळविले आहे.