सिग्नल यंत्रणा बंद, वाहनधारकात नाराजी
उचगाव/ वार्ताहर
करवीर तालुक्यातील उचगाव महामार्ग चौकात तसेच गांधीनगर तावडे हॉटेल जवळ महामार्ग चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे वाहनधारकांची मोठी कुचंबणा होत आहे. त्यातच गेली दोन वर्ष होऊनही सिग्नल यंत्रणा बंद स्थितीत असल्याने वाहनधारकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी सिग्नल यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा या भागातून खरेदीसाठी ग्राहक गांधीनगर येथे येतात.पुणे बेंगलोर महामार्गालगत ही बाजारपेठ आहे. फक्त चार वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियोजन करीत असतात. मात्र दोन्ही ठिकाणी वाहनांची संख्या खूप मोठी असल्याने येथे सिग्नलची आवश्यकता भासली यानंतर पोलिस प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर उचगाव येथे लोकसहभागातून व उचगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तसेच तावडे हॉटेल येथे माजी आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून सिग्नल बसवण्यात आले.

ग्रामपंचायत हद्दीत पहिल्यांदाच सिग्नल बसवण्याची संकल्पना पूर्णत्वास गेली. मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी बसवलेले सिग्नल दोन वर्षापासून बंद असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. गांधीनगर मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे महामार्ग चौकात ही अजूनही वाहनांची संख्या वाढत असल्याने येथील सिग्नल कार्यान्वित होणे गरजेचे आहे. झेब्रा क्रॉसिंग व इतर पांढरे मार्किंग अस्पष्ट झालेले आहेत ते पुन्हा पट्टे मारणे आवश्यक आहे.
उचगाव महामार्ग चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी सिग्नल बसवण्याचा निर्णय कळल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या सूचनेनुसार संपूर्णपणे लागेल ती मदत ग्रामपंचायतीने दिलेले आहे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल लवकरात लवकर सुरू व्हावा ही जनतेची अपेक्षा आहे – मालुताई गणेश काळे लोकनियुक्त सरपंच उचगाव
तावडे हॉटेल महामार्ग चौकात माजी आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून सिग्नल बसविण्यात आले आहेत मात्र सिग्नल अद्यापही चालू नसल्याने प्रवासी वाहनधारकांची गैरसोय होत आहे त्यामुळे प्रशासनाने सिग्नल तरी चालू करावेत – रितू लालवाणी लोकनियुक्त सरपंच गांधीनगर
सिग्नल चालू करण्यासाठी प्रयत्न सुरु असुन काही तांत्रिक बाबीमुळे बंद असलेले सिग्नल सुरु करण्यात येणार आहेत – दिपक भांडवलकर,साहाय्यक पोलिस निरीक्षक गांधीनगर पोलिस ठाणे









