रस्त्यावरून लोकप्रतिनिधींनी ये-जा करून देखील रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष : रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
वार्ताहर / उचगाव
उचगाव ते कोनेवाडी या दोन कि.मी. अंतराच्या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली असून या रस्त्यावरून लोकप्रतिनिधींनी ये-जा करून देखील या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या तीन वर्षांपासून आश्वासने देऊन देखील रेंगाळल्याने या परिसरातील असंख्य नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
उचगाव-कोनेवाडी हा संपर्क रस्ता शेतकरी व प्रवासी या सर्वांच्याच दृष्टीने महत्त्वाचा आहे. उचगाव भागातील अनेक नागरिक देवरवाडी, महिपाळगड, सुंडी, शिनोळी या महाराष्ट्र हद्दीतील भागात ये-जा करण्यासाठी तसेच त्या भागातील नागरिकांना उचगाव, गोजगे, मण्णूर, आंबेवाडी, बेकिनकेरे, अतिवाड व कोवाड या परिसरात ये-जा करण्यासाठी जवळच्या तसेच वाहतुकीसाठी सुलभ असणारा हा मार्ग आहे. या सर्व भागात ये-जा करण्यासाठी रहदारीचा बेळगाव-वेंगुर्ले या मार्गाचा अवलंब करावा लागतो. या मार्गावर सातत्याने रहदारी असते. अपघात घडतात. यासाठी सदर मार्ग प्रवासी पसंत करतात.
पावसाळय़ात चिखलाचे साम्राज्य तर उन्हाळय़ात धुळवड
या रस्त्यावर यापूर्वी माती टाकल्याने तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारीच नसल्याने व रस्त्याच्या दोन्ही बाजू उंच असल्याने पाणी साचून दलदल निर्माण झाली होती. यामुळे पावसाळय़ात सदर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंदच होती. सध्या रस्त्यावरील चिखल उन्हामुळे घट्ट बनून रस्ता ओबडधोबड बनला आहे. यातूनच शेतकरी नागरिक वाट शोधत वाटचाल करत असल्याने पुढेपुढे धुळीने संपूर्ण रस्ता माखणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळय़ात चिखलाशी तर उन्हाळय़ात धुळीशी सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
शेतवडीतील मुख्य रस्ता
उचगाव, तुरमुरी व कोनेवाडी या गावातील हजारो नागरिकांची शेती याच भागात आहे. यामुळे शेतवडीत ये-जा करण्यासाठी सर्वांना याच मार्गाचा उपयोग करावा लागतो. शेतवडीत ये-जा करण्यासाठी सर्वांना याच मार्गाचा उपयोग करावा लागतोय.
शाळकरी विद्यार्थ्यांचा एकमेव मार्ग
कोनवाडी या गावामध्ये पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. पुढील माध्यमिक शिक्षणासाठी येथील सर्व विद्यार्थ्यांना उचगाव येथेच शाळेला यावे लागते. रोज या गावातील जवळपास 60 ते 70 विद्यार्थी-विद्यार्थिनी रोज ये-जा करतात. मुली चालत व सायकलीवरून तरुण व मुले प्रवास करतात. रस्ता खराब असल्याने या विद्यार्थ्यांना दोन कि.मी. अंतर जादा कापत बेळगाव-वेंगुर्ले मार्गे, तुरमुरी गावाजवळून ये-जा करावी लागते. या मार्गावर रहदारी अधिक असल्यामुळे ही मुले जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसतात. या रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी पुलाच्या भूमिपूजनासाठी दोन वर्षांपूर्वी पाटबंधारे व आरोग्य मंत्री, आमदार याच मार्गे गेले होते. यावेळी रस्त्याचे तात्पुरते सपाटीकरण करून भूमिपूजन झाले. मात्र रस्त्याचे भाग्य काही अद्याप उजळले नाही. तरी संबंधितांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.









