वार्ताहर/ उचगाव
उचगाव-कोनेवाडी या मार्गावरील नाल्याच्या किनारी पुरातन असलेल्या शिवपिंडी व भैरवनाथ या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी या जागेत चौथरा बांधण्यात आला आहे. याचे उद्घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना शनिवार दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे.
या मार्गाच्या चौथऱयाचा परिसर पवित्र मानला जातो. या परिसराच्या उत्तर-वायव्य या दिशांना पुरातन वैजनाथ देवस्थान व डोंगरमाथ्याचा परिसर आहे. या भागात अशा शिवपिंडी सापडतात. तसेच या डोंगर माथ्यावरून वाहणारे पाणी नाल्याच्या स्वरुपात या भागातून वाहत सदर नाला मार्कंडेय नदीला मिळतो. यामुळे या भागाला एक पवित्र स्थान निर्माण झाले आहे. अशा स्थळी या भैरवनाथ व शिवपिंडीची प्रतिष्ठापना होत असल्याने उचगाव, कोनेवाडी व तुरमुरी या गावातील भाविक भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण असून जवळपासच्या शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शनिवारी घटस्थापनेच्या मुहुर्तावर या चौथरा उद्घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाझार समितीचे अध्यक्ष युवराज कदम व त्यांच्या पत्नी नंदा कदम या दांपत्याच्या हस्ते भैरवनाथ मूर्ती व होम पूजन करण्यात येणार आहे. शिवपिंडी मूर्ती पूजन कॉन्ट्रक्टर मनोज कलखांबकर व त्यांच्या पत्नी सरस्वती कलखांबकर या दांपत्याच्या हस्ते करण्यात येणार आहे. चौथरा पूजन उमेश पाटील यांच्या हस्ते तर ध्वजवंदन शिवाजी आम्रोरळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या भागातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे कमिटीचे मल्लाप्पा कदम, राजू मेणसे व मारुती खांडेकर यांनी कळविले आहे..









