वार्ताहर /उचगाव
धर्मस्थळ संस्थेच्यावतीने श्रावण महिन्यात गावातील सर्व मंदिरांचा स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त धर्मस्थळ संस्थेच्यावतीने देण्यात आलेल्या साहित्याचा वितरण सोहळा पार पडला.
अध्यक्षस्थानी उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्षा मथुरा तेरसे व सदस्य उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत धर्मस्थळ संस्थान उचगाव विभाग प्रमुख गणपती नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी बोलताना ग्रा. पं. सदस्य एल. डी. चौगुले यांनी धर्मस्थळ संस्थानच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. श्रावण महिन्यामध्ये धर्मस्थळ संस्थानच्यावतीने उचगाव विभागातील कोनेवाडी, बसुर्ते, बाची आदी गावांतील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. श्रावण महिना पवित्र महिना आहे. या महिन्यात नागरिक मंदिरांमध्ये जाऊन भक्तिभावाने पूजा करीत असतात. परिसरातील सर्व मंदिरे स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेण्याच्या संस्थेच्या कार्याबद्दल धन्यवाद देण्यात आले. यावेळी उचगाव विभाग महिला मंडळाच्यावतीने अनगोळ येथील श्रीकृष्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली. मंदिराची स्वच्छता ठेवण्यासाठी धर्मस्थळ संस्थानच्यावतीने कचरापेटी स्वच्छता करण्याचे साहित्य देण्यात आले. कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण तेरसे, गजानन नाईक, उमेश बुवा, दत्ता बेनके, सूरज सुतार, सदस्या योगिता देसाई, रूपा गिरी, बंटी पावशे तसेच धर्मस्थळ संस्थानच्या पदाधिकारी लता सुतार व गावातील संघांच्या कार्यकर्त्या व नागरिक उपस्थित होते.









