वार्ताहर/ उचगाव
उचगाव येथील मळेकरणी देवीच्या निसर्गरम्य आमराईत रविवार दि. 5 रोजी होणाऱया अठराव्या साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संमेलनस्थळी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच ग्रंथदिंडी मार्गावर अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
सीमाभागातील मराठी भाषेचे संवर्धन करणे, साहित्यिक निर्माण करणे तसेच मराठी साहित्याचा प्रसार व्हावा या हेतूने उचगाव परिसरातील मराठी भाषिक गेली 18 वर्षे संमेलनाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. संमेलनासाठी महाराष्ट्रातून दिग्गज साहित्यिक आणि बेळगाव, निपाणी, चंदगड, खानापूर तालुक्यातून साहित्यप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
किरण ठाकुर, आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती
लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप. सोसायटीचे संस्थापक चेअरमन आणि तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची खास उपस्थिती राहणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर हे उपस्थित राहणार आहेत.









