वार्ताहर / उचगाव
उचगाव ग्राम पंचायतीच्यावतीने गावामध्ये कचरा गाडी फिरविण्याचा शुभारंभ मध्यवर्ती गणपती मंदिरासमोर करण्यात आला. यावेळी गाडी पूजन अमरज्योत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बी. एस. होनगेकर यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजा करून करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष जावेद जमादार यांनी श्रीफळ वाढवून गावामध्ये कचरा गाडी फिरविण्याचा शुभारंभ करण्यात आला.
गावांमध्ये कचऱयाची समस्या मोठी असल्याने सर्व गटारी प्लास्टिक कचऱयाने भरून जात होत्या. त्यामुळे या कचऱयाची योग्य विल्हेवाट व्हावी म्हणून ग्राम पंचायतीच्यावतीने गावामध्ये दररोज कचरा गाडी फिरविण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व नागरिकांनी आपल्या घरातील कचरा गाडीमध्ये टाकण्याची विनंती करण्यात आली आहे. या कचऱयामुळे गावांतील सर्व गटारी भरून दुर्गंधी सुटत असून त्यामुळे नागरिकांचे अरोग्य धोक्यात येत आहे. यासाठी आपापल्या घरातील सर्व सुका कचरा जमा करून ग्राम पंचायतच्या गाडीमध्ये टाकण्यात यावा, अशी विनंती ग्राम पंचायत अध्यक्ष जावेद जमादार यांनी केली आहे. ही कचरा गाडी दररोज सकाळी संपूर्ण गावामध्ये फिरविण्यात येणार असल्याचा निर्णय ग्राम पंचायतीने घेतला असून नागरिकांनी संपूर्ण कचरा निर्मूलनासाठी ग्राम पंचायतीला सहकार्य करावे, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करावी, अशी विनंती पंचायतीच्यावतीने करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्य लक्ष्मण चौगुले, यादो कांबळे, बाळकृष्ण तेरसे, बंटी पावशे, मोनाप्पा पाटील, गजानन नाईक, सूरज सुतार, दत्ता बेनके, स्मिता खांडेकर, रूपाली गिरी, नागरत्ना कोरडे, रूपा गांधळे, लक्ष्मी कुराडे, योगिता देसाई, माधुरी पाटील, उमेश बुवा, अंजना जाधव, नीळकंठ कुरबुर, वाय. बी. चौगुले व पंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.









