भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱया समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी रविवार दि. 27 जून रोजी राजहंसगड रस्त्यावरील दिशादर्शक मराठी फलकाची नासधूस केली. मराठी फलक दिसल्यानंतर तो मोडून टाकायचा हा काही समाजकंटकांचा नेहमीचा उपद्व्याप पुन्हा सुरू झाला आहे. दरम्यान तो फलक सोमवारी पुन्हा उभा करण्यात आला आहे.
राजहंसगडाकडे जाणाऱया रस्त्यावर दिशादर्शक नामफलकाची उभारणी करण्यात आली होती. त्या फलकामुळे कोणते गाव कुठल्या बाजूला आहे, हे समजत होते. या परिसरात मराठी भाषिक आहेत. त्यामुळे व्यवहार मराठी भाषेतूनच चालतात. त्यामुळे मराठी भाषेत हा फलक उभारण्यात आला होता. मात्र मराठी भाषेची कावीळ असलेल्या समाजकंटकांनी त्या फलकाची नासधूस करून फलक उखडून टाकला होता.
या घटनेनंतर परिसरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सोमवारी त्या ठिकाणी जावून तो फलक नव्याने उभारला आहे. या फलकावर येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड. देसूर, वडगाव असा उल्लेख आहे. त्यामुळे वाहनचालकांना योग्य मार्ग मिळत असताना काही समाजकंटक भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे समाजकंटक कोणत्याच समाजातील व्यक्तीला कसलीच मदत करत नाहीत. कोरोनाकाळात मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते. मात्र हे सर्व समाजकंटक भूमीगत झाले होते.
या समाजकंटकांच्या उपद्रवामुळे मराठी भाषिक व इतर भाषिकही संतापले आहेत. एक तर स्वतः काहीच काम करायचे नाही आणि चांगले काम झाले तर ते बिघडवायचे कसे, हाच प्रयत्न त्यांचा सुरू आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून अशाप्रकारे यापुढे उपद्रव करणाऱयांना धडा शिकविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पोलिसांनीही अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सोमवारी फलक उभारण्यासाठी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्यासह देसूर ग्रा. पं. सदस्य पंकज घाडी, सतीश चव्हाण, रणजित पोटे, अजित देशपांडे, गिरीश गोरे, वैभव जोशी, विनोद पाटील, बाळू काळसेकर, बसवंत कदम, मनोहर शिंदे, अरुण काळसेकर, राजू जळगेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.









