कॅगच्या अहवालातून बाब उघड
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लडाख, डोकलाम आणि सियाचीन येथे तैनात असलेल्या लष्करी जवानांना गरजेनुसार कपडे आणि जेवण मिळत नसल्याची बाब कॅगच्या अहवालातून समोर आली आहे.
सोमवारी संसदेत कॅगचा अहवाल मांडण्यात आला. या अहवालात जवानांना उंच प्रदेशात आवश्यक असणारे पुरेसे कपडे, बूट, स्लीपिंग बॅग आणि जेवण मिळत नसल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे. काही ठिकाणी बर्फाच्छादीत प्रदेश आहे. तिथे आवश्यक ते कपडे आणि उंच प्रदेशात जवानांना कॅलरीज वाढविण्यासाठी विशेष जेवण दिले जाते. ते शासनाकडून मिळत नाही. संरक्षण मंत्रालयाने याकडे दुर्लक्ष केल्याचे कॅगचे म्हणणे आहे.
पर्यायी वा पूरक अन्नपुरवठा न झाल्याने या जवानांच्या कॅलरीजमध्ये तब्बल 82 टक्क्यांची घट झाल्याचे निरीक्षणही कॅगने नोंदवले आहे. त्यामुळे सरकार जवानांच्या जीवाशी खेळ करत आहे का, असाही प्रश्न कॅगने उपस्थित केला आहे. 2017 मध्ये सियाचीनमध्ये कपडे आणि अत्यावश्यक सामान नसल्याच्या 64 हजार 131 तक्रारी संरक्षण मंत्रालयाकडे आल्या होत्या.









