प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना संशयितांना तत्काळ आरोग्य सल्ला उपलब्ध व्हावा, यासाठी ई-संजीवनी ऍप विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून घरबसल्या वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. यात व्हिडिओ कॉलिंगसह तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व ई-प्रिस्क्रिप्शन प्राप्त होणार असल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात जाण्याऐवजी आता घरबसल्याच आरोग्य सल्ला मिळणार आहे. यासंदर्भात रजिस्टर प्रक्रिया सुरू असून प्राथमिक चाचणीही या ओपीडीव्दारे घेण्यात आली आहे. 15 दिवसानंतर ही ओपीडी सुरळीत सुरू होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
कोरोना संसर्ग काळात नागरिक रुग्णालयात जाण्यास मागे-पुढे पाहत होते. अनेकजण अंगावर आजार काढतात. त्यामुळे आजार गंभीर होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असते. हा प्रकार टाळण्यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाने ई -संजीवनी ओपीडी सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी एक ऍप तयार करण्यात येत आहे. ही ओपीडी सकाळी 10 ते 6 सध्या सुरू आहे, मात्र अद्याप ही सिस्टीम विकसित करण्याचे काम सुरू असल्याने 15 दिवसानंतर ही सेवा सुरळीत होईल, असे डॉ. फुले यांनी सांगितले. सध्या ही ओपीडी सुरू आहे, मात्र ही प्रक्रिया पूर्ण नसल्याने यामध्ये अनियमितता आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास डॉ. फुले यांनी व्यक्त केला आहे.
मोबाईलच्या माध्यमातून ई-ओपीडीचा लाभ घेता येणार आहे. संबंधितांना ओटीपीचा वापर करून मोबाईलवर व्हेरिफिकेशन करावे लागेल. त्यानंतर रुग्णांसाठी असलेला नोंदणी अर्ज भरून टोकनसाठी विनंती पाठवावी लागेल. आधीपासून आजार असतील तर त्याची माहिती दिल्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून मोबाईलवर पेशंट आयटी व टोकन मिळणार आहे. एसएमएस आल्यानंतर पेशंट आयडीसह लॉगिन करावे लागेल. प्रतीक्षालय ऑप्शन आल्यानंतर थोडय़ावेळात कॉल सुरू झाल्यानंतर आपल्या स्क्रिनवर डॉक्टर येतील. हे डॉक्टर आरोग्यविषयक सल्ला देवून ई-औषधपत्र देण्यात येणार आहे. हे औषधपत्र डाऊनलोड केल्यानंतर औषध खरेदी करता येणार आहे. ही मोफत सेवा असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फुले यांनी केले आहे..









