प्रतिनिधी / इस्लामपूर
ई – पीक पाहणी उपक्रमामुळे वस्तुनिष्ठ व अचूक माहिती मिळाल्याने धोरणात्मक बाबींमध्येही अचुकता येईल. त्यामुळे या उपक्रमात सुशिक्षित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी पेठ ता. वाळवा येथील शेतकरी शिवाजी बापू माळी यांच्या प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसिलदार राजेंद्र सबनिस, तलाठी, शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जयंत पाटील यांनी तलाठ्यांचे यावेळी प्रशिक्षण व ॲपचा वापर करताना काही अडचणी येतात का याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्यावतीने सुरु असलेल्या ई-पीक पाहणी ॲपचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देत त्यांना या उपक्रमाचे महत्व सांगितले. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, हे ॲप वापरण्यासाठी अत्यंत सुलभ आहे. या ॲपवर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून दिली जाणारी मदत तात्काळ संबंधितांकडे पाठविणे सोईचे होणार आहे. या ॲपवर पीक नोंदणी करताना किंवा पीक नोंदणीसाठी काही अडचण असल्यास ग्रामीणस्तरावरील तलाठी, कृषी सेवक हे मदत करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.