डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय, दापोली येथील विद्यार्थी कु.ओंकार गवस व कु.अक्षय देसाई यांनी केले ‘ई-पीक पाहणी’ योजनेविषयी मार्गदर्शन
प्रतिनिधी / दोडामार्ग:
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय, दापोली येथील विद्यार्थी कु.ओंकार मनोहर गवस व कु.अक्षय विलास देसाई यांनी ‘ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजने’ अंतर्गत श्री नागनाथ कला, क्रीडा व व्यायाम मंडळ ,तेरवण-मेढे च्या सभागृहात शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या ‘ई-पीक पाहणी’ योजनेविषयी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणीचे हे पहिलेच वर्ष असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत याविषयी माहिती पोहोचण्याच्या हेतूने हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता.
आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ई-पीक पाहणी ॲपविषयी ,तसेच या योजनेचे फायदे व महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले.या कार्यक्रमास उपस्थित असलेले कृषी सहायक श्री. एन.एस.चौधरी यांनी मार्गदर्शन करतेवेळी ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प शेतकऱ्यांना कसा सक्षम करेल हे पटवून दिले.यानंतर तेरवण-मेढे येथील ग्रामस्थ हेमंत गवस यांनी ई-पीक पाहणी ॲपचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.
आयोजित कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना पीक पाहणीची नोंदणी लवकरात लवकर करावी असे आव्हान केले.