20 मार्चपर्यंत ई-केवायसी करावी : अन्यथा कारवाईचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
रेशन वितरणातील गैरप्रकार रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून लाभार्थी रेशनचा लाभ घेत आहेत. मात्र, ई-केवायसीची मोहीम खात्याने आता गतिमान केली असून ई-केवायसीची मुदत पुन्हा वाढविली आहे. लाभार्थ्यांनी 20 मार्चपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा रेशनपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा खात्याने दिला आहे.
स्थलांतरित व्यक्ती, मृत व्यक्ती, विवाहित मुली व इतर लाभार्थ्यांच्या रेशनातील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी खात्याने ई-केवायसीचे काम हाती घेतले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे ई-केवायसी लांबणीवर पडली होती. मात्र, आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कोरोना काळासाठी अतिरिक्त रेशनचा पुरवठा केला जात आहे.
मात्र, काही ठिकाणी रेशन वितरणात गैरव्यवहार होताना दिसत आहे. अशांवर आळा घालण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे.
मागील काही दिवसांपासून नवीन बीपीएल कार्डच्या कामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांची संख्या वाढली आहे. दरम्यान, मृत व्यक्तींची नावे रेशनकार्डमधून तातडीने कमी होत नाहीत. त्यामुळे त्याचा गैरफायदा काही लाभार्थी घेत असतात. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. शंभर टक्के ई-केवायसीचे काम पूर्ण करण्यासाठी खात्याची धडपड सुरू आहे. मात्र, तांत्रिक अडचणी आणि लाभार्थ्यांचे दुर्लक्ष यामुळे ई-केवायसीच्या अडचणी वाढल्या आहेत.









