श्रीकृष्णपुत्र प्रद्युम्नाला पाहून द्वारकावासियांना अत्यंत आनंद झाला व महत् आश्चर्यही वाटले. प्रसूतीनंतर सहाव्या दिवशीच जो बालक अचानक नाहीसा झाला होता, तो आपल्या पत्नीला बरोबर घेऊन अचानक द्वारकेत आला होता. मेल्यानंतर एखाद्याची स्वर्गात भेट व्हावी त्यापेक्षाही हे आश्चर्यकारक आहे. सर्वजण म्हणू लागले-अहो! दैवाची गती मोठी विलक्षण असते. ही किती भाग्याची गोष्ट आहे की, हा मुलगा जणू मरून परत जिवंत होऊन आला. श्रीकृष्ण व रुक्मिणी हे खरोखरच भाग्यवान आहेत. द्वारकेत सर्वत्र उत्सव साजरा करण्यात आला. गुढय़ा उभारण्यात आल्या. मखर सजवले गेले. तोरणे लावली गेली. ध्वज उभारले. लोकांचा उत्साह वाहून जात होता. ब्राह्मणांचे षोडशोपचार पूजन करण्यात आले. लोकांनी रुक्मिणी कृष्णाला अहेर दिले. वसुदेव देवकी व पितरांचा गौरव करण्यात आला. वाजंत्री वाद्ये वाजवू लागली. नृत्य गायनाच्या मैफिली सजू लागल्या. वस्त्रे, धनधान्य, गायी वाटण्यात आल्या. सर्व द्वारकावासी सुखात आनंदात रममाण झाले.
नगरी सालंकृत साभरणें । घरोघरिं संतर्पणें ।
वांटिती वसनें रत्नें सुवर्णें । प्रमुदित मनें सर्वांचीं ।
रतिप्रद्युम्ना पाहोन । निवती द्वारकावासी जन ।
दंपतीचे वदती गुण । करिती लोण सर्वस्वें ।
दैवें उभयतांच्या सरिपाडा । ईश्वरें योजूनि दिधला जोडा । दुष्टदृष्टीची न बधो पीडा । अक्षय चुडा असो इचा । ऐशीं अनेक आशीर्वचनें । द्वारकावासी वदती वदनें । दंपतीतें वस्त्रें भूषणें । विचित्राभरणें समर्पिती।
असो ऐसा जनपदस्नेहो । प्रेमें करिती महोत्साहो ।
तो सविस्तर भारतीनाहो । वर्णू पहा हो शकेना ।
सर्वांनी अलंकार धारण केले. घरोघरी जेवणावळी उठल्या. वस्त्रे, सुवर्ण व रत्ने दान करण्यात आली. सगळय़ांची मने आनंदीत झाली. रति व प्रद्युम्नाला पाहून द्वारकावासियांची मने निवाली. दांपत्याचे सर्वजण गुणवर्णन करू लागले. त्यांच्यावरून सर्वस्व ओवाळून टाकू लागले. या दोघांचेही दैव श्रे÷ आहे म्हणून असा जोडा तयार झाला. ईश्वरानेच हा जोडा तयार केला. कोणाचीही दुष्ट दृष्ट यांना न लागो. या मायावतीचा चुडा अक्षय राहो असे आशीर्वाद लोक देत होते. असा हा जो प्रेमोत्सव द्वारकेत झाला त्याचे यथार्थ वर्णन करणे कुणालाही शक्मय नाही. या सर्व प्रसंगाचा पारमार्थिक भावार्थ प्रकट करताना भागवताचार्य वै. डोंगरे महाराज म्हणतात-शंबरासूर हा कल्याण झाकून टाकणारा लौकिक काम आहे. प्रद्युम्न अलौकिक काम आहे. लौकिक कामाला अलौकिक कामानेच नष्ट केले जाऊ शकते. जगातील कोणत्याही जीवाची नव्हे, तर केवळ परमात्म्याचीच भेट घेण्याची इच्छा आणि आशा करा. नारायणधामीं जायची इच्छा करा. प्रभूची भेट झाल्यावर जीवाला अलौकिक आनंद मिळत असतो. भगवंताला भेटण्याची आतुरता जागृत झाली तर लौकिक कामाचा नाश होईल. ती रति कोण आहे? भगवंताच्या कथेविषयी रूचि हीच रति होय. ह्या रतीबरोबर विवाह झाल्याने जीव प्रभूमीलनासाठी आतुर होतो. ही रतीच जीवाला अखेर परमात्म्यापाशी आणते.
ऍड. देवदत्त परुळेकर








