बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने रविवारी स्वतःचा 36 वा वाढदिवस साजरा केला आहे. ईशाला तिच्या बोल्डनेससाठी ओळखले जाते. ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असून स्वतःची बोल्ड आणि हॉट छायाचित्रे ती शेअर करत असते. स्वतःच्या जन्मदिनी दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने स्वतःच्या वैयक्तिक जीवनापासून विवाहासारख्या मुद्दय़ांवर मत मांडले आहे.

आपल्याबद्दल प्रसिद्ध होणाऱया वृत्तांबद्दल मला कुठलाच फरक पडत नाही. माझ्या जीवनात सर्वात महत्त्वाचे कुटुंब आणि मित्र आहेत. महिलांना नेहमीच पुरुषांपेक्षा कमी लेखले जाते. मी श्रीमंत व्यक्तीशी विवाह केल्यास आणि काही काळानंतर तो विभक्त झाल्यास मी निर्वाह भत्त्यासह जगू इच्छित नाही. माझ्याकडे स्वतःचे काहीतरी असायला हवे. माझे समर्थन करणारा आणि मला बदलण्याचा प्रयत्न न करणारा जोडीदार मला हवा असल्याचे ईशाने म्हटले आहे.
क्रीडाप्रेमी असल्याने क्रीडाजगतावर बेतलेला चित्रपट करण्याची इच्छा आहे. पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा आहे. घोडेस्वारी आणि स्काय डायव्हिंगपासून सी डायव्हिंगपर्यंत मी सर्वकाही एका चित्रपटात करू इच्छिते असे तिने म्हटले आहे.









