गृहमंत्री अमित शाह यांनी काढले उद्गार : डेस्टिनेशन नॉर्थ-ईस्ट 2020चे आयोजन : पर्यटनाला चालना मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक पर्यटन दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी ‘डेस्टिनेशन नॉर्थ-ईस्ट 2020’ महोत्सवाचे ऑनलाईन उद्घाटन केले आहे. ईशान्येशिवाय भारत आणि भारतीय संस्कृती अपूर्ण आहे. ईशान्येतील संस्कृती भारतीय संस्कृतीचे आभूषण आहे. ईशान्येतील अर्थव्यवस्था, पर्यटन आणि रोजगाराला बळ देण्यासाठी तेथे शांतता प्रस्थापित करणे आवश्यक ठरले होते. हिंसा, उग्रवाद आणि बंदमुळे यापूर्वीच चर्चेत असणारा ईशान्य भारत आता तेथील विकासामुळे नाव कमावत असल्याचे शाह म्हणाले.
भारतातील अनेक पर्यटनस्थळांना भेट दिली आहे, परंतु ईशान्येसारखा अनुभव कुठेच मिळाला नाही. ईशान्येतील संस्कृती जोपर्यंत सामील होत नाही तोवर भारतीय संस्कृतीला परिपूर्ण मानता येणार नाही. ईशान्येतील संस्कृती भारतीय संस्कृतीचा मुकूट असल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.
नव भारताचे इंजिन
कोविड-19 महामारी संपल्यावर ईशान्येमध्ये सुवर्णयुग सुरू होणार आहे. हे क्षेत्र भारतात पर्यटन आणि व्यापाराचे पसंतीचे ठिकाण ठरणार आहे. ईशान्येचा भाग नव्या भारताचे नवे इंजिन ठरणार आहे आणि नवा भारत साकार करण्यासाठी तोच नेतृत्व करणार असल्याचे उद्गार ईशान्य भारत विकास मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी काढले आहेत. या कार्यक्रमाला ईशान्येतील राज्यांचे मुख्यमंत्रीही तसेच मंत्री उपस्थित होते.
विशेष दिनी विशेष कार्यक्रम
डेस्टिनेशन नॉर्थ-ईस्ट 2020 दरवर्षी आयोजित होणारा कार्यक्रम आहे. याचा उद्देश देशाच्या उर्वरित राज्यांना ईशान्येच्या विशेष संस्कृतीची ओळख करून देणे आणि त्यांच्यात राष्ट्रीय भावना बळकट करणे आहे. यंदाच्या कार्यक्रमासाठी ‘उदयास येणारी सुंदर ठिकाणे’ अशी थीम तयार करण्यात आली आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने पर्यटनाला चालना देणारा आहे. विशेष म्हणजे रविवारी पर्यटन दिनदेखील साजरा करण्यात आला आहे.









