केंद्रनिहाय मते जगजाहीर होत असल्याने समस्या, गुप्त मतदान प्रक्रियेला धक्का
वार्ताहर/ बेंगळूर
सार्वत्रिक निवडणुकीत वापरण्यात येणारे ईव्हीएम (इलेट्रॉनिक होटिंग मशीन) डिकोडिंग व्यवस्था वापरावी, अशी मागणी सर्वच मतदारसंघातून होत आहे. इलेट्रॉनिक मशीनमुळे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सोपी झाली असली तरी त्याच्या निकालातून कोणत्या उमेदवाराला कोणत्या गावातून अथवा प्रभागातून किती मते पडली, याची माहिती जगजाहीर होत असल्याने गुप्त मतदान पद्धतीला धक्का पोचत असल्याची स्थिती आहे.
मतदान गावनिहाय व केंद्रनिहाय जाहीर होत असल्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी कमी मतदान झालेल्या भागाला टार्गेट करत असल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. राज्यातील सर्व 224 मतदारसंघातून ही तक्रार आहे. निवडून आलेले आमदार कमी मते पडलेल्या गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया केली जात होती. मतमोजणीवेळी सर्व मतपेटय़ा एकत्र आणून त्या मिक्स केल्या जात होत्या. त्यानंतर त्यांचे प्रत्येकी गठ्ठ? करून त्यातून मतमोजणी केली जात होती. त्यामुळे केंद्रात अथवा गावात कुणाला किती मते पडली याची माहिती कोठेच मिळत नव्हती. त्यामुळे गुप्त मतदान पद्धत खऱयाखुऱया पध्दतीने गुप्त राहत होती.
आता ईव्हीएम आल्यानंतर कुठल्या केंद्रात कुणाला किती मते पडली त्याची सविस्तर माहिती तात्काळ मिळत आहे. त्यामुळे येथून निवडून आलेले उमेदवार आपल्याला कमी मतदान झालेले केंद्र, गाव यांना टार्गेट करत असतात. तेथील समस्यांकडे दुर्लक्ष करणे, कामासाठी लोक गेल्यावर तुमच्या गावातून मतदान कमी झाले आहे, असे थेट बोलून दाखविण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही गावांना, वसतींना पाच वर्षांसाठी कामांपासून दूर राहावे लागत असल्याचे प्रकार घडत आहेत.
निवडून येण्यासाठी उमदेवार ठरावीक गावांवर लक्ष केंद्रित करून इतर गावांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे सर्व भागाचा विकास होताना दिसत नाही. त्यामुळे जिथे मतदान कमी तिथे पाच वर्षे कामे कमी अशी स्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
डिकोडिंगमुळे माहिती गुप्त
मतदान यंत्रे आली असली तरी त्यातून गुप्त मतदान कायम राहण्यासाठी आता यंत्रांना डिकोडिंग करण्याची मागणी पुढे आली आहे. यंत्राला डिकोडिंग केल्यास कुठल्या केंद्रातून अथवा गावातून किती मतदान झाले हे कोणालाही कळणार नाही. लोकशाही व्यवस्थेत गुप्त मतदान पद्धत टिकविण्यासाठी निवडणूक आयोगाने ही मागणी उचलून धरल्यास कोणालाही मते कळणार नाहीत.









