सूडबुद्धीतून कारवाई केली जात असल्याचा आरोप
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा विरोध करण्यासाठी बुधवरी शहर व जिल्हा शिवसेना रस्त्यावर उतरली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी ईडीच्या विरोधात निदर्शने केली. केंद्रीय तपास यंत्रणाकडून सूडबुद्धीतून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करत ‘ईडी का घरगडी’ अशा घोषणाही यावेळी शिवसेनिकांनी दिल्या.
भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर रडीचे राजकारण करण्यासाठी केला जात असून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जाणीवपूर्वक सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, किशोर घाटगे, दीपक गौड, हर्षल सुर्वे, योगेश चौगुले, मनजीत माने, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, रणजित जाधव, संतोष रेवणकर, दादू शिंदे, सुनिल खोत, रियाज बागवान, अल्लाउद्दीन नाकाडे, रमेश पवार सुनिल खेडेकर विष्णुपंत पवार विक्रम पवार शिवतेज सावंत कपिल पवार शैलेश साळुंखे आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी सहभागी झाले होते.








