ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या अनेक दिवसांपासून ईडी (ED) विरुद्ध संजय राऊत (sanjay raut) असा एक वेगळा कलगीतुरा रंगलेला आपण पाहिला आहे. याआधी ईडीने संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत (sunil raut) यांच्यावर कारवाई केल्याने जोरदार वाद निर्मांण झाला होता. आता ईडीने आपला मोर्चा थेट शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडे वळविला आहे. संजय राऊतांना ईडीनं मोठा दणका दिला आहे. संजय राऊतांचे अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्त करण्याची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून (BJP) संजय राऊतांना लक्ष्य केलं जात आहे.
दरम्यान, ईडीने मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी झाल्यांनतर त्यांना अटक केली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.
सोमय्यांचे संजय राऊतांवर आरोप
संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आले आहे, असे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते. त्यानंतर राऊतांच्या कुटुंबीयांवर ईडीची छापेमारी झाली होती. त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर ही कारवाई करण्यात आली होती. याबाबत स्वतः संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला होता.