भारताचा 243 धावांनी विजय : सामनावीर विराट कोहलीचे नाबाद शतक : जडेजाचे 33 धावांत 5 बळी
वृत्तसंस्था/ कोलकाता
सामनावीर विराट कोहलीचे नाबाद शतक, श्रेयस अय्यरची तुफानी खेळी व रविंद्र जडेजाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सुरुवातीला भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 326 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 27.1 षटकांत 83 धावांत आटोपला. टीम इंडियाचा हा वर्ल्डकपमधील सलग आठवा विजय ठरला आहे.

ईडन गार्डन मैदानावर या सामन्यात आफ्रिकन संघाला विजयासाठी 327 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 27.1 षटकांत केवळ 83 धावांत गारद झाला. आफ्रिकन संघाच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही. तर भारताकडून रवींद्र जडेजाने 5 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेत मोलाची भूमिका बजावली. आफ्रिकेकडून मार्को यान्सेनने सर्वाधिक 14 धावा केल्या. त्याच्याशिवाय टेम्बा बवुमा 11, रासी व्हॅन डर डुसेन 13 आणि डेव्हिड मिलरने 11 धावा केल्या. या 4 फलंदाजांशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकले नाही.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. रोहित शर्माने पहिल्या चेंडूपासूनच आफ्रिकन गोलंदाजांविरोधात हल्लाबोल केला. रोहितने गिलच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 35 चेंडू 62 धावांची भागीदारी केली. त्याने अवघ्या 24 चेंडूमध्ये 6 चौकार व 2 षटकारासह 40 धावांचा पाऊस पाडला. आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात रोहित रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहित पाठोपाठ शुबमन गिलही फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. गिल 24 चेंडूत 23 धावा काढून तंबूत परतला. गिल याने या खेळीत चार चौकार आणि एक षटकार मारला.
श्रेयस अय्यरचीही तुफानी खेळी

गिल बाद झाल्यानंतर अय्यर मैदानावर आला. पण सुरुवातीला आफ्रिकन म्रायापुढे अय्यर चाचपडला. पण जम बसल्यानंतर मात्र त्याने फटकेबाजी केली. अय्यरने 87 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारासह 77 धावांची झंझावती खेळी केली. यादरम्यान त्याने विश्वचषकातील तिसरे अर्धशतक ठोकले. अय्यर आणि विराट कोहलीने भारताच्या डावाला आकार दिला. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 158 चेंडूत 134 धावांची भागीदारी झाली. 37 व्या षटकात एन्गिडीने अय्यरला 77 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
विराटचे विक्रमी शतक

अय्यर माघारी परतल्यानंतर राहुलकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण केएल राहुल मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्याने 8 धावा केल्या. दुसरीकडे विराटने मात्र संयमी खेळी साकारताना 119 चेंडूमध्ये शतक ठोकले. सुरुवातीच्या षटकात विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. चांगल्या चेंडूला मान देत त्याने एकेरी दुहेरी धावावर भर दिला. विराटने 49 व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. 121 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 101 धावा करून तो नाबाद राहिला. दुसरीकडे सूर्यकुमार यादवने फिनिशिंगचा प्रयत्न केला, पण मोठी खेळी करता आली नाही. सुर्यकुमारने पाच चौकारांच्या मदतीने 22 धावा काढल्या. सूर्या बाद झाल्यानंतर जडेजा आणि कोहलीने फिनिशिंग टच दिला. जडेजाने 15 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 29 धावांचे महत्वाचे योगदान दिले. यामुळे भारताला निर्धारित 50 षटकांत 5 बाद 326 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 5 बाद 326 (रोहित शर्मा 40, शुभमन 23, विराट कोहली नाबाद 101, श्रेयस अय्यर 77, सुर्यकुमार 22, जडेजा नाबाद 29, एन्गिडी, रबाडा, यान्सेन, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज प्रत्येकी एक विकेट)
दक्षिण आफ्रिका 27.1 षटकांत सर्वबाद 83 (यान्सेन 14, व्हॅन डर 13, बवुमा 11, मिलर 11, जडेजा 33 धावांत 5 बळी, शमी व कुलदीप यादव प्रत्येकी दोन बळी).
विराटचे ऐतिहासिक शतक, सचिनच्या 49 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी
ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर द.आफ्रिकेविरुद्ध विराटने शानदार शतकी खेळी साकारली. त्याच्या या शानदार खेळीमुळे खास विक्रमाची नोंदही झाली. विराटने आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकत सचिनच्या वनडेतील शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये 49 शतके ठोकली होती. आता या विक्रमाची विराटने बरोबरी केली आहे. कोहलीने अवघ्या 277 डावात 49 वे वनडे शतक ठोकले. सचिन तेंडुलकरला 49 वनडे शतकांसाठी 452 डाव लागले होते. सचिनच्या वनडे शतकांची बरोबरी केल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्ल्डकपमधील विराटचे हे दुसरे शतक आहे.
वनडेत सर्वाधिक शतके
- 49 विराट कोहली (277 डाव)
- 49 सचिन तेंडुलकर (452 डाव)
- 31 रोहित शर्मा (251 डाव)
- 30 रिकी पाँटिंग (365 डाव)
- 28 सनथ जयसूर्या (433 डाव)
विराट बर्थडेला शतक करणारा तिसरा भारतीय तर जगातील सातवा खेळाडू

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) आपल्या 35 व्या वाढदिवशी कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक करत सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांची बरोबरी केली आहे. याशिवाय, या शतकासह खास पराक्रम केला आहे. तो वाढदिनी शतक ठोकणारा जगातील सातवा तर भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. कोहलीच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनीच त्यांच्या बर्थडेला शतक केले आहे. दरम्यान, विराटपूर्वी वाढदिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी पाहिली, तर त्यात अव्वलस्थानी न्यूझीलंडचा स्टार खेळाडू टॉम लॅथम आहे. त्याने 2022 मध्ये हॅमिल्टन येथे 30 व्या वाढदिवशी नेदरलँड्सविरुद्ध नाबाद 140 धावांची झंझावाती शतकी खेळी केली होती.
वाढदिनी वनडेत शतक झळकावणारे खेळाडू
140 टॉम लॅथम, वि नेदरलँड, हॅमिल्टन, 2022 (30 वा)
134 सचिन तेंडुलकर, वि ऑस्ट्रेलिया, शारजाह, 1998 (25 वा)
131 रॉस टेलर, वि पाकिस्तान, पल्लेकेले, 2011 (27 वा)
130 सनथ जयसूर्या, वि बांगलादेश, कराची, 2008 (39 वा)
121 मिचेल मार्श, वि पाकिस्तान, बेंगळूर, 2023 (32 वा)
100 विनोद कांबळी, वि इंग्लंड, जयपूर, 1993 (21 वा)
101 विराट कोहली वि. द.आफ्रिका, कोलकाता, 2023 (35 वा)
रोहितचा असाही अनोखा विक्रम

आफ्रिकेविरुद्ध लढतीत रोहितने वेगवान सुरुवात करुन देताना 24 चेंडूत 40 धावा केल्या. यामध्ये त्याने दोन षटकारही खेचले. यासोबतच तो वनडे विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार ठरला. त्याचसोबत रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही ठरला आहे. वनडे विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार यापूर्वी इयान मॉर्गन होता. मॉर्गनने 2019 विश्वचषकात इंग्लंडचे नेतृत्व करताना 22 षटकार मारले होते आता या यादीत रोहित शर्मा 22 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. या यादीत तिसरा क्रमांक एबी डिविलियर्सचा आहे. त्याने 21 षटकार खेचले आहेत. याशिवाय, रोहित एका वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. याआधी हा विक्रम एबी डिविलियर्सया नावावर होता. डिविलियर्सने 2015 मध्ये सर्वाधिक 58 वनडे षटकार मारले होते. रोहितनेही रविवारी वर्षीतील 58 षटकार पूर्ण केले. येत्या काही सामन्यांमध्ये त्याच्या षटकारांचा आकडा नक्कीच वाढू शकतो.









