वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने कोविडच्या वाढत्या संकटामुळे विविध प्रकारच्या सुविधा व्यापारी व अन्य क्षेत्रांना देण्यासाठीचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये सध्या केंद्राने व्यापारी वर्गाला दिलासा देणारा निर्णय घेतला असून यामध्ये ई वे बिलाची वैधता येत्या 30 जूनपर्यंत वाढविली असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या अगोदर 30 एप्रिलनंतर 30 मेपर्यंत हा कालावधी वाढवून दिला होता. त्यात पुन्हा एकदा वाढ करत 30 जूनपर्यंत ई वे बिल भरण्याचा दिलासा दिलेला आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड यांच्या एका नोटीसमधून 24 मार्च 2020 रोजी किंवा त्या अगोदर जे ई वे बिल तयार केले होते त्यांची वैधता ही पुन्हा वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ई वे बिल घेणाऱयामध्ये जे 50 हजार रुपयापेक्षा अधिक किमतीचे साहित्य ट्रान्स्पोर्टच्या आधारे वाहतूक करतात त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार आहे. तसेच परतावा खंडीत करण्यासाठी 30 जूनपर्यंतचा कालावधी दिलेला असल्याचेही केंद्रीय कर बोर्डाने स्पष्ट केले आहे.









