प्रतिनिधी / इस्लामपूर
उपचारा दरम्यान मृत्यू पावलेल्या वृध्द महिलेवर पुढे दोन दिवस उपचार करून आर्थिक लुबाडणूक करणारा येथील आधार हेल्थ केअरचा डॉ.योगेश वाठारकर याला पोलीसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने सोमवार दि.१२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मृत सायरा शेख(६०, रा.कासेगाव) यांचा मुलगा सलीम यांनी डॉ.वाठारकर याच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
डॉ.वाठारकर याच्या हिन कृत्यामुळे शहर व वाळवा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. सायरा हमीद शेख यांना मुलाने दि.२४ फेब्रुवारी रोजी डॉ.वाठारकर याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्या नॉनकोविड होत्या. मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. दि.२४ फेब्रुवारी ते दि.१० मार्च या काळात वेगवेगळ्या तपासणी करुन जनरल व आयसीयू मध्ये उपचार केले. दि.८ मार्च रोजी पासून डॉ.वाठारकर याने नातेवाईकांना रुग्ण सायरा यांना भेटण्यास मनाई केली. दि १० मार्च रोजी त्यांना मृत घोषीत करुन मृतदेह मुलाच्या ताब्यात दिला.
मुलगा सलीम याने एक महिन्यानंतर आईच्या मृत्यूचा दाखला नगरपालिकेतून मिळवला असता, त्यामध्ये मृत्यू दि.८ रोजी झाल्याचे नमूद करण्यात आले होते. हॉस्पिटलमधील कागदपत्रावर मात्र दि. १० पर्यंत उपचार सुरु असल्याचे दिसून येत होते. पैशाच्या लोभासाठी दोन दिवस मृत आईवर उपचार केल्याचे लक्षात येताच, सलीम यानी वाठारकर विरुध्द पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्याकडे अर्ज दिला.पिंगळे यांनी हे प्रकरण अभिप्रायासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांच्याकडे पाठवले.अहवाल प्राप्त होताच मंगळवारी गुन्हा दाखल करुन डॉ.वाठारकर याला अटक केली.
Previous Articleकोल्हापूर अहमदाबाद विमानसेवा शनिवारी पूर्ववत होणार
Next Article कोल्हापूर : वसगडेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण








