पाच दुचाकी हस्तगत
प्रतिनिधी / इस्लामपूर
शिराळा व कराड हद्दीतून पाच मोटारसायकलची चोरी केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी एकास अटक केली. दिपक पांडुरंग पाटील (मूळ रा.चिकुर्डे, सध्या कोळे, ता. कराड) असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलीस उपधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. पाटील हा येथील प्रशासकीय कार्यालय परिसरात चोरीची मोटारसायकल विक्रीस येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सपोनि साळुंखे यांच्यासह हवालदार उत्तम माळी जमीर मुलाणी, अमोल सावंत, गणेश शेळके,सुरज जगदाळे, उमेश शेटे, योगेश जाधव यांनी सापळा रचला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने विक्रीस आणलेली दुचाकी शिराळा तालुक्यातील बांबवडे येथून चोरल्याचे पुढे आले. अधिक तपासात पाटील याने दीड लाख रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकल चोरल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अटक करुन त्याला न्यायालयात हजर केले असता,त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.