तीन तासांत पोलीसांकडून छडा : तीन तोळयाचा
इस्लामपूर / प्रतिनिधी
येथील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील संगीता प्रकाश थरवल(४५) यांच्या घरातील दीड लाख रुपये किंमतीचा सुमारे तीन तोळे वजनाचा सोन्याचा शाही हार मोलकरणीनेच चोरल्याचे उघडकीस आले. पोलीसांनी अवघ्या तीन तासात या चोरीचा छडा लावला.
किसाबाई बाबुराव कदम (५६ रा.ताकारी रोड, निनाईनगर, इस्लामपूर), असे संशयीत महिलेचे नाव आहे. थरवल कुटुंब हे डोंबिवली-मुंबईला असते. त्यांचा मोठा मुलगा प्रथमेश याचा विवाह दि.२६ डिसेंबर रोजी असल्याने संगीता या पती व दोन मुलांसह इस्लामपूरला आल्या होत्या. दरम्यान घरातील धुणी-भांडी करण्यासाठी किसाबाई कदम यांना मजूरीने ठेवले होते. दरम्यान सोमवारी सकाळी साडे नऊ ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास संगीता बरबल या मुंबईला जाण्यासाठी बॅगा भरुन ठेवताना त्यांनी गळ्यातील हार काढून बॅगेवर ठेवला होता. बाहेर घंटागाडी आल्याने त्या कचरा टाकण्यास गेल्यानंतर हाराची चोरी झाली. यावेळी मोलकरीण कदम ही घरात होती. थरवल यांनी मोलकरणीवर संशय व्यक्त करत इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली.
पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुखे यांच्या पथकाने मोलकरीण किसाबाई हिच्याकडे कसून तपास केला. किसाबाई हिने हार चोरल्याची कबुली दिली. पोलीसांनी हार हस्तगत केला आहे.