जायंट्सचा पुढाकार, इच्छेनुसार नेत्रदान
प्रतिनिधी/इस्लामपूर
येथील आण्णा बुढ्ढे हॉटेलचे मालक अरुण शंकर सांभारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे नेत्रदान करण्यात आले. तर जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूरच्या पुढाकाराने त्वचादान करण्याचा निर्णय घेण्यात आला. इस्लामपूर शहराच्या इतिहासातील हे पहिले त्वचादान आहे.
इस्लामपूर शहराला फार मोठी सामाजिक व सांस्कृतिक परंपरा आहे.शहरामध्ये रक्तदान, अवयवदान, नेत्रदान या सारख्या चळवळी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जोर धरत आहेत. सर्वांना काही प्रमाणात नवखी असणारी त्वचादान ही संकल्पना सर्वात प्रथम जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर ने उचलून धरली व त्या माध्यमातून गेली सहा महिने हा ग्रुप काम वेगवेगळया उपक्रमातून या विषयासंदर्भात जनजागृतीचे काम करीत आहे.शहरातील ज्येष्ठ नागरीक,इस्लामपूर मधील सुप्रसिद्ध हॉटेल अण्णा बुढ्ढेचे मालक,ॲड. प्रितम सांभारे यांचे वडील अरुण शंकर सांभारे(दादा) यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे नेत्रदान व जायंटस ग्रूप ऑफ इस्लामपूरच्या पुढाकाराने त्वचादान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांच्या या पुढाकारामुळे त्वचादानाची चळवळ रूजू होईल, अशी अपेक्षा जायंटस् पदाधिकारी यांनी व्यक्त करतानाच त्वचादान साठी इच्छुकांनी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
हे त्वचादान व नेत्रदान करणेसाठी जायंटस् चे अध्यक्ष दुष्यंत राजमाने, कार्यवाह रणजीत जाधव, खजिनदार ॲड श्रीकांत पाटील, युनिट डायरेक्टर राजकुमार ओसवाल, सदस्य डॉ. सदानंद जोशी, गजानन परब,उदय सांभारे,राजा माळगी यांनी पुढाकार घेतला.