विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजूरी : पोलीसउपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांची माहिती : पाच जणांच्या या टोळीवर गंभीर १३ गुन्हे
प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील पंक्या मुळीक गँगवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळी विरुध्द खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, सावकारी, अपहरण, मारामारी, बेकायदेशीर जमाव, शिवीगाळ व दमदाटी या सारखे एकूण १३ गुन्हे आहेत. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना मोक्का कायद्यातंर्गत कारवाई व्हावी यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता, त्यास मंजुरी मिळाल्याची माहिती, पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पंकज नंदकुमार मुळीक(२२,रा.किसानगर,इस्लामपूर), सुरज उर्फ दाद्या राजाराम बाबर(२१,उरुण-इस्लामपूर), अजित उर्फ राजकुमार सिध्दाप्पा दोडमणी (२२,महादेवनगर, इस्लामपूर), उमेश दिनकर नाईक(२१, अहिरवाडी), ओंकार रमेश जाधव(१९.रा.गाताडवाडी), अशी मोक्कातंर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींनी प्रथमेश सुधीर कांबळे यास तू विक्रांत क्षीरसागर याच्या बरोबर का फिरतोस असे म्हणत हॉटेल कोकस येथून उचलून बेघर वस्ती जवळ नेवून लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली होती.
यावेळी आरोपी बाबर याने तेथे पडलेला लोखंडी गज उचलून कांबळे यास मारला होता. यावेळी कांबळे याने मला मारू नका, मी कोणा सोबत फिरणार नाही, असे म्हणत होता. आरोपी बाबर याने कांबळे याला जर पोलीसांत तक्रार केली तर जीवे मारुन टाकू, तुझा कायमचा काटा काढू, असे म्हणत कांबळे याला जखमी अवस्थेत आष्टानाका परिसरात सोडून गेले होते.
या प्रकरणी कांबळे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली होती. या सर्व आरोपींच्यावर एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई होण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पाठवला होता, त्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजूरी दिली आहे. हा मोक्का प्रस्ताव करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षिक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षिक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, हवलदार संदीप सावंत, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुतार यांनी या कारवाईत भाग घेतला.
उपविभागातील ८ मोक्का, ४५ आरोपी
पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी आपल्या कार्यकाळात संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी इस्लामपूर व आष्टा येथील ८ टोळयांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. सध्याचा हा ८ वा मोक्का असून त्यात ४५ आरोपींचा सहभाग आहे. मोक्कांतर्गत कारवाई बरोबरच झोपडपट्टी दादा, गंभीर गुन्हयातील आरोपींची हद्दपारी या कारवाई वरही भर देण्यात आला.








