कृष्णात पिंगळे : २१०० पानाचे मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूरसह जिल्हयात खून, खुनाचा प्रयत्न, सावकरी,जबरी चोरी असे १५ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अज्या मेहरबान टोळीस मोक्का अंतर्गत अंतिम मंजूरी तसेच मोक्का न्यायालयात २१०० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अप्पर पोलिस महासंचालक डॉ. राजेंद्र सिंग यांनी अंतिम मंजूरी दिल्यानंतर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
अज्या मेहेरबान टोळीप्रमुख अजित हणमंत पाटील (२८ रा. इस्लामपूर), सुरज उर्फ पांडया अशोक जाधव (२६ रा. तानाजी चौक), प्रतिक उर्फ पिल्ल्या सुरेश पाटील (१९ रा. तिरंगा चौक), कपिल कृष्णात पवार(२६, उदय चौक ),सचिन उर्फ रघू बाबुराव कोळेकर (३३ रा. निनाईनगर), संतोष भिमराव कोळेकर (३२ रा. इस्लामपूर) व एक अल्पवयीन याच्यावर मोक्काअंतर्गत मंजूरी व मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
पिंगळे म्हणाले, टोळीप्रमुख अजित पाटील याने साथीदारांच्या मदतीने अनेक गुन्हे केले आहेत. रविवार दि. २८ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास टोळीत सहभागी होत नसल्याच्या कारणावरून त्याच्यासह साथीदारांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष रखमाजी कदम याचा खून केला होता.
अजित पाटील याच्यासह त्याच्या साथीदारांवर खून, खूनाचा प्रयत्न, सावकारी, जबरी चोरी करून जखमी करणे, खंडणी असे १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. त्याशिवाय या टोळीने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्यानेही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीची गुन्हेगारी कृत्ये वाढल्याने त्यांच्यावर जुलैमध्ये मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती. त्यास कायदा व सुव्यवस्था, अप्पर पोलिस महासंचालक डॉ. राजेंद्र सिंग यांनी अंतिम मंजूरी दिली. तसेच दि. २३ डिसेंबर रोजी त्यांच्यावर इस्लामपूर येथील मोक्का न्यायालयात गुन्ह्याचे २१०० पानी दोषारोपपत्र दाखल केले.
या कारवाईसाठी पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाअधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरिक्षक नारायण देशमुख यांनी तपास केला. तपासकामी पो.ना. संदीप सावंत यांचे सहकार्य मिळाले.








