चेन्नई
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) स्वतःच्या अर्थ ऑब्जर्वेशन उपग्रहाच्या नामकरणाची नवी पद्धत अवलंबिली आहे. अशा उपग्रहांचे नाव आता ‘ईओएस’पासून सुरू होणार आहे. नामकरणाच्या नव्या पद्धतीनुसार इस्रोच्या रडार इमेजिंग उपग्रह रीसॅट-2बीआर2 चे नाव आता ईओएस-01 असणार आहे. हा उपग्रह 7 नोव्हेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाणार आहे. याचबरोबर अन्य देशांचे 9 उपग्रहही प्रक्षेपित होणार आहेत. 2020 मधील इस्रोची ही पहिली प्रक्षेपण मोहीम ठरणार आहे. ईओएस-01 मुळे कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यांमध्ये मदत होणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. सिंथेटिक अपर्चर रडारने (एसएआर) युक्त हा इमेजिंग उपग्रह सर्व ऋतूंमध्ये छायाचित्रे प्राप्त करण्यास सक्षम आहे. हा उपग्रह दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही छायाचित्रे प्राप्त करू शकतो. या उपग्रहामुळे अनेक कार्यांवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे.
इस्रो आगामी प्रक्षेपण मोहिमेकरता पीएसएलव्ही रॉकेटच्या डीएल आवृत्तीचा वापर करणार असून यात दोन स्ट्रप-ऑन बूस्टर मोटर्स बसविण्यात आले आहेत. यापूर्वी या प्रक्षेपकाच्या आवृत्तीचा पहिल्यांदा वापर 24 जानेवारी 2019 रोजी मायक्रॉसॅट आर उपग्रहाकरता करण्यात आला होता.
कोरोना महामारीमुळे इस्रोने या प्रक्षेपणादरम्यान सर्वसामान्यांसाठीची रॉकेट लाँचिंग ह्यू गॅलरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीहरिकोटा रॉकेट बंदरावरही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिसून येणार नाहीत.









