ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ‘GSAT-30’ या दूरसंचार उपग्रहाचे आज पहाटे 2 वाजून 35 मिनिटांनी दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून यशस्वी प्रक्षेपण केले.
इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्रोने प्रक्षेपण केलेला ‘GSAT-30’ हा एक दूरसंचार उपग्रह आहे. या आधुनिक उपग्रहामुळे इंटरनेटचे स्पीड वाढणार आहे. सध्याच्या इनसॅट-4 या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत आहे. इनसॅट-4 हा उपग्रह 2005 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. बदलत्या काळानुसार अधिक शक्तिशाली आणि आधुनिक उपग्रहाची गरज होती. त्यामुळे ‘GSAT-30’ या उपग्रहाचे आज प्रक्षेपण करण्यात आले. इनसॅट-4 ची जागा आता ‘GSAT-30’ घेणार आहे.
‘GSAT-30’ या उपग्रहाला जिओ इलिप्टकिल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आले आहे. त्याचे वजन अंदाजे 3100 किलो असून लाँचिंगपासून 15 वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. मोबाईल सेवा, व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेलिव्हिजन आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे.









