द्विपक्षीय संबंधांची नवी ऐतिहासिक झेप : इस्रायल अन् अमेरिकेचे शिष्टमंडळ युएईत दाखल
वृत्तसंस्था/ अबू धाबी
इस्रायलच्या एल आल एअरलाइन्सने सोमवारी पहिल्यांदाच अबू धाबीसाठी उड्डाण केले आहे. इस्रायलच्या तेल अवीव शहरापासून संयुक्त अरब अमिरातसाठी हे पहिले व्यावसायिक उड्डाण आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांदरम्यान शांतता करार झाला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 13 ऑगस्ट रोजी ट्विट करत याची घोषणा केली होती.
तेल अवीव नजीकच्या बेन गुरियन विमानतळावरून एल आल एअरलाइन्सचे विमान भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजता रवाना झाले. या विमानातून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि व्हाइट हाउसचे सल्लागार जेरेड कुशनर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ युएईत पोहोचले आहे.
ऐतिहासिक प्रवासास प्रारंभ
इस्रायल-संयुक्त अरब अमिरात यांच्यातील विमानोड्डाणाने मध्यपूर्वेच्या देशांदरम्यान ऐतिहासिक प्रवास सुरू होऊ शकतो, असे उद्गार कुशनर यांनी काढले आहेत. इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मीर बेन शबात हे ज्यू देशाकडून युएईचा प्रवास करणारे सर्वात वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत. विमानाच्या कॉकपिटवर ‘शांती’ शब्द अरबी, इंग्रजी आणि हिब्रूमध्ये लिहिण्यात आला आहे. संबंध प्रस्थापित करण्यासाठी इस्रायल आणि युएई यांच्यात 13 ऑगस्ट रोजी कराराची घोषणा करण्यात आली होती. इजिप्त आणि जॉर्डन यांच्यानंतर इस्रायलशी करार करणारा युएई हा तिसरा अरब देश ठरला आहे.
कित्येक महिन्यांपासून गुप्त चर्चा
ट्रम्प अनेक महिन्यांपासून या करारासाठी प्रयत्नशील होते. सर्वप्रकारची चर्चा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. ट्रम्प यांनी कराराची घोषणा करण्यापूर्वी दूरध्वनीवरून एकाचेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि युएईच्या शेख जायेद यांच्याशी संवाद साधला होता. कराराच्या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि युएई आता परस्परांच्या देशांमध्ये दूतावास स्थापन करणार आहेत.









